महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार घमासान रंगलं आहे. दोन्ही आघाडीतील नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. भाजपने बड्या-बड्या नेत्यांना महराष्ट्रात प्रचारसभा घेण्यासाठी राजकीय मैदानात उतरवले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे स्टार प्रचारक आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज (9 नोव्हेंबर) प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी प्रचारादरम्यान कोल्हापूर येथील महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी महालक्ष्मी अंबाबाईची मनोभावे पूजा केली. यावेळी त्यांनी अंबाबाईकडे सर्वांना सुखी, समाधानी करण्याची प्रार्थना केली.
दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री सावंत सपत्नीक अक्कलकोट दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्याबरोबर महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी देखील होते. मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक स्वामी समर्थांचे दर्शन घेतले होते. आता यापुढे विधानसभा निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री सावंत महाराष्ट्रात प्रचारसभा घेतानाही दिसणार आहेत. खासकरुन कोकण पट्ट्यात मुख्यमंत्री सावंत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसतील.
भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.