

गणेशोत्सव जवळ येताच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र यंदा रेल्वेने गावाकडे जाण्याचा विचार करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण सुरू होताच काही मिनिटांतच प्रमुख गाड्यांमधील सर्व जागा भरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट झपाट्याने वाढत असून काही गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादीच बंद झाल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि मुंबई महानगर प्रदेशातील लाखो चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी, म्हणजेच कोकणात जातात. त्यामुळे या काळात रेल्वे आरक्षणावर मोठा ताण येतो. यंदाही आरक्षणाची प्रक्रिया सुरू होताच प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक केल्याने काही मिनिटांतच बहुतांश गाड्या हाऊसफुल झाल्या.
कोकणकन्या एक्स्प्रेस, मंगळुरू एक्स्प्रेस, वंदे भारत, जनशताब्दी, मांडवी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस आणि वांद्रे-मडगाव एक्स्प्रेससारख्या लोकप्रिय गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. काही गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादी मोठ्या प्रमाणात वाढली असून, तर काही गाड्यांसाठी वेटिंग तिकीटही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नियमित आरक्षणातून जागा मिळण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे.
रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्याने आता अनेक चाकरमानी एसटी महामंडळाच्या सेवेकडे वळण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात कोकणासाठी अतिरिक्त बसगाड्या सोडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी एसटी महामंडळाने हजारो जादा फेऱ्यांची व्यवस्था करून प्रवाशांना दिलासा दिला होता. यंदाही प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकार आणि एसटी महामंडळाकडून विशेष नियोजन होण्याची शक्यता आहे.
प्रवासाचे नियोजन अद्याप केले नसेल, तर पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा विचार करण्याची वेळ आली आहे. एसटी बस, खासगी बस सेवा किंवा कारपूलसारखे पर्याय अनेक जण निवडू शकतात. तसेच रेल्वेकडून विशेष गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा होते का, याकडेही प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असल्याने लाखो नागरिक गावाकडे परततात. त्यामुळे रेल्वेच्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्या आणि एसटीच्या अतिरिक्त बसची व्यवस्था करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. वेळेत योग्य नियोजन झाल्यास हजारो प्रवाशांना दिलासा मिळू शकतो. यंदाच्या गणेशोत्सवात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार कोणते निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.