निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापुरात 1.30 कोटींचं गोवा बनावटीचं मद्य जप्त; राजस्थानच्या एकाला बेड्या; अणुस्कुरा घाटात मोठी कारवाई
Kolhapur Liquor Seizure: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात कडक आचारसंहिता लागू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर मद्य तस्करीविरोधात एक मोठी कारवाई केली. शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा येथील राजापूर-मलकापूर मार्गावर एका ट्रकवर छापा टाकून तब्बल 1 कोटी 30 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा मोठा साठा समाविष्ट आहे.
भरारी पथकाची धाडसी कारवाई
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या काळात छुप्या मार्गाने मद्याची वाहतूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथक क्रमांक-1 ने गस्त वाढवली होती. बुधवारी (21 जानेवारी) रात्री उशिरा पथकाला खात्रीशीर बातमी मिळाली की, एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मद्य नेले जाणार आहे. या माहितीच्या आधारे पथकाने राजापूर-मलकापूर मार्गावरील अणुस्कुरा फाटा येथील एका हॉटेलजवळ सापळा रचला आणि पहाटे साडेपाचच्या सुमारास संशयास्पद वाटणारा सहा चाकी ट्रक (क्रमांक MH-20-EG-1310) अडवला.
1 कोटी 15 लाखांचे मद्य आणि मुद्देमाल जप्त
सुरक्षा दलांनी जेव्हा या ट्रकची झडती घेतली, तेव्हा त्यांना त्यामध्ये गुपचूप लपवलेला गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा प्रचंड साठा आढळला. तपासणीत 180 मिली क्षमतेच्या 76800 सीलबंद बाटल्यांनी भरलेले एकूण 1600 बॉक्स जप्त करण्यात आले. या मद्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 1 कोटी 15 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. मद्यसाठ्यासह 15 लाखांचा ट्रक आणि मोबाईल असा एकूण 1 कोटी 30 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी (Police) हस्तगत केला आहे.
राजस्थानच्या आरोपीला बेड्या
याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक रामजीवन विरधाराम बिश्नोई (वय 26, रा. बाडमेर, राजस्थान) याला जागीच अटक केली. हा मद्यसाठा गोव्यातून नेमका कुठे नेला जात होता आणि यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. ही कारवाई जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दुय्यम निरीक्षक अजय वाघमारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

