महाराष्ट्रातील राजकारण मागील दोन दिवसांपासून शिवसेनेतील बंडाळीमुळे चांगलंच गाजत आहे. शिवसेना नेते आणि महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करुन शिवसेनेला मोठा धक्का दिला. त्यामुळे आता शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्यात विधान परिषदेची निवडणुक पार पडली. या निवडणुकानंतर मंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारासंह शिवसेनेशी बंडखोरी करत सुरतला रवाना झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यातील सत्तानाट्याला सुरुवात झाली. महाराष्ट्रात राजकीय सत्तातंर होणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
तर दुसरीकडे, भाजपने आपल्या आमदारांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काल रात्री मंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारासंह सुरतहून गुवाहाटीला रवाना झाले. तर आज सकाळी शिंदेंनी आपल्याला 45 आमदारांचा पाठिंबा असल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले. याच पाश्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांना साद घातली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, 'आज सकाळी माझी कोरोना टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर बोलण्यासारखं बरच आहे. कोरोना काळात सरकारने जनतेची सेवा केली. प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना मी सरकारच्या माध्यमातून काम केले.'
उध्दव ठाकरे म्हणाले, 'हिंदुत्व आणि शिवसेना (Shiv Sena) एकमेकांत गुंफलेली आहे. त्यामुळे हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. बाळासांहेबांची शिवसेना आजही जिवंत आहे. शिवसेनेच्या वाटचालीत अनेकांनी हातभार लावला. बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांना करायचा आहे. दुसरीकडे, शिवसेनेतील काही मंत्री, आमदार सुरतहून गुवाहाटीला गेल्याचे कळत आहे. मात्र यामधील काही आमदारांचे आता फोन येतायेत. त्यामुळे त्यांना तिकडं कोण घेऊन गेलं हे आपल्याला चांगलंच माहित आहे.'
उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, ''भाजपपासून (BJP) फारकत घेऊन आपण कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करत तीन पक्षांचं सरकार स्थापन केलं. मात्र आता जे काही राज्यात सुरु आहे, ते पाहून धक्का बसला आहे. शरद पवारांच्या आग्रखातर मी राज्याचा मुख्यमंत्री बनलो. मात्र आता माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर मी राजीनामा देऊन टाकतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी मुलगा आहे. मला कोणत्याही पदाचा, प्रतिष्ठेचा मोह नाही. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मी माझा मुक्काम वर्षातून मातोश्रीवर हालवतो. जोपर्यंत माझ्याबरोबर शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक आहेत तोपर्यंत मी काम करत राहीन. यामध्ये माझी कोणत्याही प्रकारची आगतिकता नाही.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.