

रत्नागिरी: नाताळची सुटी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणच्या किनारपट्टीवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. मात्र, याच उत्साहाच्या वातावरणात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईच्या एका कुटुंबावर काळाने झडप घातली. समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने कुटुंबातील तिघे जण बुडाले, ज्यामध्ये एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या पवई परिसरात राहणारे अमोल मुथ्या हे आपल्या कुटुंबासह नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोकणात आले होते. निसर्गरम्य गुहागर समुद्रकिनाऱ्यावर आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हे कुटुंब पोहण्यासाठी पाण्यात उतरले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असताना, अचानक समुद्राच्या लाटांचा वेग वाढला आणि बघता बघता अमोल मुथ्या यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगा खोल पाण्यात ओढले गेले.
कुटुंब बुडत असल्याचे लक्षात येताच किनारी असलेल्या पर्यटकांनी आरडाओरडा केला. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक जीवरक्षकांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उड्या घेतल्या. अथक प्रयत्नांनंतर जीवरक्षकांनी अमोल यांच्या पत्नीला आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने अमोल मुथ्या (४२) यांना वाचवण्यात अपयश आले. काही वेळाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे पवई परिसरात आणि गुहागरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या सुट्ट्यांमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची संख्या वाढली आहे. अनेक ठिकाणी समुद्र खवळलेला असतो किंवा काही ठिकाणी पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही पर्यटक खोल पाण्यात जाण्याचा धोका पत्करतात. पर्यटकांनी उत्साहाच्या भरात समुद्राचे नियम धाब्यावर बसवू नयेत, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.