काळाचा घात करणारा दिवस होता 28 ऑक्टोबर 2017 ! निमित्त ठरलं ते दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याचं. त्यानंतर जे घडलं ते अवघ्या महाराष्ट्राचा थरकाप उडवणारं होतं. ज्या आईच्या पोटी जन्म घेतला, त्या आईलाच लेकानं संपवलं. परंतु इतक्यातच न थांबता त्याने त्या माऊलीचं काळीज काढून खाण्याचा आघोरी प्रयत्नही केला. आपल्या जन्मदात्या आईचा खून करुन अवघा थरकाप उडवणारं कृत्य करणाऱ्या नराधम लेकाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली. सुनील कुचकोरवी (Sunil Kuchkorvi) असे या निर्दयी आरोपी मुलाचे नाव असून, वीस वर्षानंतर कोल्हापूरामध्ये (Kolhapur) फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आईची हत्या केल्याच्या प्रकरणाची सुनवाणी तीन दिवसांपूर्वीच पूर्ण झाली होती. न्यायालयाने सुनवाणी पूर्ण झाल्यानंतर हत्येसंदर्भात केलेली टिप्पणी लक्षात घेऊन त्याला फाशीची शिक्षा होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. न्यायालमाध्ये सुनावणीवेळी आरोपी सुनील याने आपणास पत्नी, चार मुले असल्याने कुटुंबाची जबाबदारी असून खूप मोठी शिक्षा देण्यात येऊ नये, अशी क्षमायाचना न्यायालयाकडे करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी निकाल देत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या खटल्यामध्ये सरकारी वकिल विवेक शुक्ला यांनी काम पाहिले.
28 ऑक्टोबर 2017 रोजी नेमकं घडलं होतं काय ?
कोल्हापूरमधील छत्रपती ताराराणी (Chhatrapati Tararani) पुतळ्याजवळ माकडवाला वसाहत आहे. या ठिकाणी मयत यलव्वा कुचकोरवी ही आपल्या मुलासह राहत होती. आरोपी सुनिल कुचकोरवी हा व्यसनाधीन होता. तो सतत आईशी भांडण करत होता. त्याने 28 ऑक्टोबर 2017 रोजी आईकडे दारुसाठी पैशाचा घाट घातला होता. त्यावर आई पैसे देत नसल्याच्या कारणामुळे धारदार शस्त्राांनी निर्दयपणे आईचा खून केला. इतक्यातच न थांबता बेभान झालेल्या नराधमाने आईच्या शरीरातील अवयव बाजूला काढून त्यातून काळीज शिजवून खाण्याचा प्रयत्न केला. तात्काळ या घटनेची नोंद शहापुरी पोलिस ठाण्यात घेतली गेली. त्यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते.
पोलिस पथकाला बक्षीस; 12 साक्षीदार
आज झालेल्या या खटल्याच्या सुनवाणी दरम्यान कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी आरोपी सुनील कुचकोरवी याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. सरकारी वकिल यांनी सुनावणीदरम्यान 12 साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षी , सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन शिक्षा अखेर सुनावली. सहकार्य पोलिस निरिक्षक सुरेश परीट, एम एम नाईक यांचे सहकार्य खटल्यादरम्यान लाभले. या खटल्याचा तपास पोलिस निरिक्षक संजय मोरे आणि त्यांच्या पथकाने तांत्रीक कौशल्याच्या आधारे केला. तसेच या तपास कार्याबद्दल पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी या पथकाला पंधरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
तब्बल वीस वर्षानंतर फाशी
राज्यभर कोल्हापूर जिल्ह्यातील बालक हत्याकांड मालिका गाजली होती. या प्रकरणामध्ये सीमा गावितसह तिघांना फाशीची शिक्षा वीस वर्षापूर्वीच सुनावण्यात आली होती. आता त्यानंतर कोल्हापूरमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.