आज मुंबई येथे दिवा ते ठाणे दरम्यान नव्या रेल्वे मार्गिकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते शुभारंभ करण्यात आला. ही मार्गिका मुंबईच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती देणार आहे. त्यामुळे हा प्रवास आणखी सुफरफास्ट होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस आगोदर मुंबईकरांना ही मोठी भेट देण्यात आली आहे.
नवी मार्गिका सुरु झाल्याने मुंबईच्या (Mumbai) विकासाला अधिक गती मिळणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करतांना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी व्यक्त केली. नवी मार्गिका सुरु झाल्याने मध्य रेल्वेवर 36 नव्या लोकल गाड्या धावणार आहेत.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वे सेवांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.
उद्घाटनाच्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठीतून भाषणास सुरुवात केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. गुरुवारीच नवी मुंबई येथे देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन झालं. त्यामध्ये सुध्दा केंद्राचा मोठा सहभाग आहे. आणि पुढे म्हणाले की, मी मराठीत बोलतोय, कारण नरेंद्र मोदी यांना मराठी चांगलं समजतं, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हणताच नरेंद्र मोदी आणि उपस्थीतांना हसायला आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मुंबईत ज्या सेवेची सुरुवात होते त्याचं जाळ हे देशभर पसरत जातं. सुरुवातीला मुंबई ते ठाणे पर्यंत रेल्वे सेवा सुरु झाली आणि त्याचा विस्तार हा देशभर झाला. काल नवी मुंबईतून देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ झाला. ठाणे दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’ स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली. या नवीन मार्गामुळे लाखो बांधवांना फायदा होणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला गती देण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या नवीन मार्गीकांमुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गीका असतील. तसेच मध्य रेल्वेच्या मार्गावर आज पासून 36 नवीन लोकल सुरु होणार असून त्यामध्ये वातानुकुलित लोकलचा समावेश असल्याचेही पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी यावेळी सांगितले.
यूपीएच्या कारभारावर निशाणा
“रेल्वेमधील सुधारणा या क्रांतीकारी बदल आणू शकतात. त्यामुळे केंद्र सरकार गेल्या 7 वर्षांत रेल्वेच्या आधुनिकीकरणाला प्रोत्साहन देत आहे. पूर्वीच्या काळात पायाभूत सोयी-सुविधा प्रकल्प वर्षानुवर्ष सुरू राहायचे. कारण नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत कोणताही ताळमेळ साधला जात नव्हता. मात्र आम्ही पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टरप्लॅन तयार केला आहे त्या माध्यामातून हाे काम चालू आहे”, असेही मोदी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.