महाराष्ट्रात 3 नव्या अभयारण्यांसह 12 संवर्धीत क्षेत्रांची घोषणा
महाराष्ट्रात नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्रे आणि विस्तारित लोणारसह 3 अभयारण्य घोषित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. ते राज्य वन्यजीव मंडळाच्या 18 व्या बैठकीत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी वनहत्तींच्या समस्या, संवर्धन राखीव क्षेत्रे, नवीन अभयारण्य क्षेत्रे, धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास, या मुद्यांवर चर्चा करत अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठीचे निर्णय घेतले. ( Chief Minister Uddhav Thackeray announces new wildlife reserve areas and reserved areas )
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, वन क्षेत्रातील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत विश्वासात घेऊन चर्चा करणे आवश्यक आहे. त्यांच्या समस्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वन्य जीवांच्या सुरक्षेबाबत प्राधान्य देण्याची आता वेळ आली असून वनक्षेत्रातील विकास कामांबाबत प्रस्ताव आणताना, त्यांचा सर्व अंगानी विचार व्हावा. केवळ सर्वेक्षणाच्या मान्यतेनंतर कधीकधी थेट प्रकल्पांना मान्यता मिळाल्याप्रमाणे कामे सुरु होतात. तसे होऊ नये याची काळजी घ्यावी. असे ही ते यावेळी म्हणाले.
राज्यात आतापर्यंत एकूण 15 संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील 8 क्षेत्रांना गत दोन वर्षांत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये या नव्या 12 संवर्धन क्षेत्रांची भर पडल्याने मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, वनक्षेत्रातील रस्ते विकासांच्या कामांना मान्यता देताना वन्यजीवांच्या भ्रमण मार्गांची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः संवेदनशील तसेच व्याघ्र प्रकल्पातील कामांबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच अभयारण्य क्षेत्रातील गावांच्या विकास कामांबाबत स्थानिकांशी चर्चा करुयात. या चर्चेत तज्ज्ञ आदींना सहभागी करून घेण्यात यावे. असे ही ते यावेळी म्हणाले.
दोडामार्गातील वनहत्तींच्या समस्येवर तोडगा काढणार
यावेळी बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्ग मधील वन्यहत्ती समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यात अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या परिसरात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानी पोटी भरपाई निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आजरा, चंदगड, तिलारी या परिसरातील हत्तींचा प्रवेश बंद करण्याबाबत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा ही करण्यात आली.
राज्यातील 12 संवर्धन राखीव क्षेत्र पुढील प्रमाणे
आज घोषित करण्यात आलेल्या 12 संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये धुळे जिल्ह्यातील (दोन) चिवटीबावरी (66.04 चौ.कि.मी), अलालदारी (100.56 चौ.कि.मी), नाशिक जिल्ह्यातील (चार) कळवण (84.12 चौ.कि.मी), मुरागड (42.87 चौ.कि.मी), त्र्यंबकेश्वर (96.97 चौ.कि.मी), इगतपुरी (88.499 चौ.कि.मी) रायगड जिल्ह्यातील (दोन) रायगड (47.62 चौ.कि.मी), रोहा (27.30 चौ.कि.मी), पुणे जिल्ह्यातील भोर (28.44 चौ.कि.मी), सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) फुलपाखरू (1.07 चौ.कि.मी ), कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार (5.34 चौ.कि.मी), नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा (103.92 चौ.कि.मी), यांचा समावेश आहे.
राज्यात 10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित केलेले पुढील प्रमाणे
महाराष्ट्रात 10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये मयुरेश्वर – सुपे (5.145 चौ.किमी.), बोर (61.64), नवीर बोर (60.69), विस्तारित बोर (16.31), नरनाळा (12.35), लोणार वन्यजीव अभयारण्य (3.65), गुगामल राष्ट्रीय उद्यान (361.28 चौ.कि.मी), येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य (22.37), नायगाव- मयूर वन्यजीव अभयारण्य (29.90), देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्य (2.17) यांचा समावेश आहे.
या बैठकीत संरक्षित क्षेत्र व पर्यावरण संवेदशील क्षेत्रातील विविध विकास प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.