Yuvraj Singh Hopefull for Shubman Gill return In India vs Pakistan ICC ODI Cricket World Cup 2023 :
वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघात शनिवारी (१४ ऑक्टोबर) सामना होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दरम्यान, या सामन्यातही भारताचा सलामीवीर शुभमन गिलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. अशातच त्याला युवराज सिंगने त्याला खास सल्ला दिला आहे.
गिलला काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे तो त्यातून सध्या सावरत आहे. त्याला भारताकडून पहिल्या दोन सामन्यात खेळताही आले नव्हते. पण आता तो अहमदाबादमध्ये भारतीय संघात सामील झाल्याचे समजले आहे.
तसेच त्याने सरावाला सुरुवातही केली आहे. पण तो सामना खेळण्यासाठी उपलब्ध आहे की नाही, यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
अशात एएनआयशी बोलताना युवराज सिंगने म्हटले की 'शुभमन गिलला मी तगडे बनवले आहे, मी त्याला सांगितले की मी कर्करोगाशी लढताना वर्ल्डकप खेळलो आहे. आशा आहे की तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळण्यासाठी सज्ज होईल.'
'जेव्हा तुम्हाला ताप असतो आणि डेंग्यु होतो, तेव्हा क्रिकेट सामना खेळणे कठीण असते, मी त्याचा अनुभव घेतला आहे. मला आशा आहे की तो जर तो तंदुरुस्त असेल, तर तो नक्की खेळेल.'
त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान सामन्याबद्दल युवराज म्हणाला, 'ही वेळ पुन्हा येणार नाही, त्यामुळे त्याचा आनंद घ्या. फक्त या सामन्याचाच नाही, तर यानंतरही अनेक सामने आहेत. आशा आहे की हा चांगला सामना होईल.'
भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून ज्याप्रकारे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेची सुरुवात केली आहे, त्याबद्दलही त्याने कौतुक केले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ विकेट्सने आणि अफगाणिस्तानविरुद्ध ८ विकेट्सने विजय मिळवला होता.
याबद्दल युवराज म्हणाला, 'भारतीय संघात आधीच आत्मविश्वास आहे, कारण त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला पराभूत केले आहे. रोहित शर्माने केलेले शतक शानदार होते. मला वाटते की या क्षणी तरी दोन्ही संघांमध्ये आत्मविश्वास आहे. त्यामुळे हा थरारक सामना व्हायला हवा.'
'मोहम्मद रिझवान चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दोन्ही संघांसाठी चांगले सामने झाले आहेत. विशेषत: पाकिस्तानसाठी, त्यांनी श्रीलंकेविरुद्ध ३०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग केला आहे, त्या विजयाने त्यांना आत्मविश्वास दिला असेल.'
दरम्यान, युवराज हा २०११ वर्ल्डकप स्पर्धेचा मालिकावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे. त्याने २०११ मध्ये भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.