Irani Cup, Madhya Pradesh vs Rest of India: बुधवारपासून इराणी कप स्पर्धेचा सामना 2021-22 रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मध्य प्रदेश विरुद्ध शेष भारतीय संघात (Rest Of India) सुरु झाला आहे. या सामन्याचा पहिलाच दिवस शेष भारतीय संघातील यशस्वी जयस्वाल आणि अभिमन्यू ईश्वरनने गाजवला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या शेष भारतीय संघाकडून कर्णधार मयंक अगरवालची 2 धावांवर विकेट गेल्यानंतर जयस्वाल आणि ईश्वरन यांनी दमदार खेळ केला. या दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 371 धावांची भागीदारी रचली.
तसेच जयस्वालने या भागीदारी दरम्यान द्विशतकही पूर्ण केले. त्याने 259 चेंडूत 213 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 30 चौकार आणि ३ षटकार ठोकले. तसेच ईश्वरनने 240 चेंडूत 154 धावांची खेळी केली. त्यामुळे शेष भारताने पहिल्या डावात पहिल्या दिवसाखेर 3 बाद 381 धावा केल्या आहेत.
जयस्वाल आणि ईश्वरनने मध्यप्रदेशविरुद्ध केलेली 371 धावांची भागीदारी ही इराणी कप स्पर्धेतील सर्वोच्च धावांची भागीदारी ठरली आहे. दरम्यान, या सामन्यात जयस्वाल आणि ईश्वरन 85 व्या षटकात लागोपाठच्या चेंडूंवरच बाद झाले. ईश्वरनला सारांश जैनने धावबाद केले, तर जयस्वालला आवेश खानने त्रिफळाचीत केले.
जयस्वाल इराणी कप स्पर्धेत द्विशतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. तो सध्या केवळ 21 वर्षांचा आहे. यापूर्वी हा विक्रम प्रविण आमरे यांच्या नावावर होता. आमरे यांनी 1990 साली वयाच्या 22 व्या वर्षी इराणी कपमध्ये द्विशतक झळकावले होते.
त्याचबरोबर जयस्वाल भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एकाच हंगामात दुलीप ट्रॉफी आणि इराणी कप स्पर्धेत द्विशतक झळकावणारा पहिलाच खेळाडू देखील ठरला आहे. त्याने दुलीप ट्रॉफी 2022 स्पर्धेत पश्चिम विभागाकडून खेळताना ईशान्य विभागाविरुद्ध 228 धावांची खेळी केली होती. तसेच दक्षिण विभागाविरुद्ध 265 धावांची खेळी केली होती. आणि आता त्याने इराणी ट्रॉफीमध्येही 213 धावांची खेळी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.