WTC Final: मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जूनमध्ये होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
या संघात अजिंक्य रहाणेचे वर्षभरानंतर पुनरागमन झाले आहे. मात्र, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी कसोटी संघातील जागा गमावली आहे. याव्यतिरिक्त मोठे बदल भारताच्या संघात झालेले नाहीत.
दरम्यान, अंतिम सामना खेळण्यासाठी जरी 15 खेळाडूंचीच निवड झाली असली तरी एकूण 19 खेळाडू इंग्लंडला जाणार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये संघात निवड झालेले 15 खेळाडू आणि 4 नेट गोलंदाज यांचा समावेश असणार आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार उमरान मलिक, मुकेश कुमार, कुलदीप सेन आणि नवदीप सैनी हे चार गोलंदाज देखील नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी भारतीय संघाबरोबर लंडनला जाऊ शकतात. या चौघांचीही गेल्या काही काळातील आणि आयपीएल 2023 मधील गोलंदाजी चांगली झाली आहे.
कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. तसेच 12 जून हा राखीव दिवसही असणार आहे. हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणार असून लंडन मधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघ कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहिल्याने त्यांनी अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे.
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. यापूर्वी भारताने 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या-वहिल्या कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळला होता. त्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
असा आहे भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.