WPL 2023 Auction: वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामासाठी मुंबईत लिलाव सुरू आहे. या लिलावात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला कोट्यावधी रुपयांची बोली लागली आहे.
हरमनप्रीत कौरसाठी फ्रँचायझींमध्ये बरीच चढाओढ पाहायला मिळाली. स्मृती मानधनाप्रमाणे हरमनप्रीत कौरसाठीही मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात चूरस होती. पण अखेर मुंबई इंडियन्सने बाजी मारली आणि तिला 1 कोटी 80 लाखांची बोली लावली.
त्यामुळे आता हरमनप्रीत कौर यंदा मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदासाठीही पर्याय ठरू शकते. तिने आत्तापर्यंत 147 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यात तिने 1 शतक आणि 9 अर्धशतकांसह 2956 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्स घेतल्या आहेत.
हरमनप्रीत कौरलाही यापूर्वी परदेशी टी20 लीग खेळण्याचा अनुभव आहे. परदेशी लीग खेळणाऱ्या पहिल्या काही भारतीय खेळाडूंमध्ये हरमनप्रीत देखील होती. तिने आत्तापर्यंत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये लीग क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे तेथील अनुभव देखील तिला पहिल्या डब्ल्यूपीएलसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, तिची अष्टपैलू क्षमता तिची जमेची बाजू आहे. ती फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही योगदान देऊ शकते. त्याचबरोबर तिची फलंदाजीची शैली आक्रमक आहे. त्यामुळे आता तिच्याकडून पहिल्या डब्ल्यूपीएलमध्ये मुंबईला मोठी अपेक्षा असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.