Kiran Navgire: तिच्या बॅटवर प्रमोशनल स्टीकर नव्हतं, पण धोनीचं नाव होतं अन् फलंदाजीत दमही तसाच...; Photo Viral

UPW vs GG: गुजरात जायंट्सविरुद्ध युपी वॉरियर्सकडून फिफ्टी केलेल्या किरण नवगिरेने तिच्या बॅटवर धोनीचं नाव लिहिलं होतं, त्याचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
Kiran Navgire
Kiran NavgireDainik Gomantak

WPL 2023: वूमन्स प्रीमियर लीग 2023 मध्ये तिसऱ्या सामन्यात शनिवारी युपी वॉरियर्सने अखेरच्या षटकात गुजरात जायंट्सविरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला. युपीच्या या विजयात किरण नवगिरेने केलेल्या अर्धशतकाचाही मोठा वाटा राहिला. दरम्यान, तिची एमएस धोनीचं नाव लिहिलेली बॅट या सामन्यात चर्चेचा विषय ठरली.

या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत युपीसमोर 170 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना युपीने सुरुवातीच्या तीन विकेट्स झटपट गमावल्या. 20 धावांतच 3 विकेट्स गेल्याने युपी संघ संकटात सापडला होता. पण युपीला या संकटातून किरणने बाहेर काढले.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या किरणने आक्रमक फलंदाजी करताना दीप्ती शर्माबरोबर 66 धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी केली. पण दीप्ती 11 धावांवर बाद झाल्यानंतर ती देखील अर्धशतक करून 13 व्या षटकात बाद झाली. पण तिने 43 चेंडूत केलेली 53 धावांची खेळी युपीसाठी महत्त्वपूर्ण ठरली. या खेळीत किरणने 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

Kiran Navgire
'IPL असो किंवा WPL, RCB जैसे थे!', DC विरुद्ध बॉलर्सने 223 धावा दिल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

किरण ही भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची मोठी चाहती आहे. तिने यापूर्वीही सांगितले होते की 2011 वर्ल्डकप फायनलमध्ये धोनीचा शेवटचा षटकाराने तिला प्रेरणा दिली होती. त्यानंतर तिने त्याला फॉलो करणे सुरू केले होते. तिला त्याच्यासारखी फलंदाजी करायची होती.

किरण जेव्हा डब्ल्यूपीएलमध्ये गुजरातविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात उतरली, तेव्हा तिने फलंदाजीसाठी आणलेल्या बॅटवर कोणतेही प्रमोशनल स्टीकर नव्हते, पण धोनीच्या नावाची आद्याक्षरे आणि त्याचा जर्सी क्रमांक म्हणजेच 'MSD 07' असे लिहिलेले होते.

त्यामुळे तिच्या या बॅटचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी तिने फक्त धोनीचं नावच बॅटवर लिहिलं नाही, तर फलंदाजीतही तसा दम दाखवल्याचे म्हटले. तसेच अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Kiran Navgire
WPL 2023: रोमांचक सामन्यात UP चा गुजरातवर विजय! हॅरिसच्या आक्रमणापुढे गर्थच्या 5 विकेट्स व्यर्थ

दरम्यान, या सामन्यात किरण बाद झाल्यानंतरही युपीने पुढच्या दोन विकेट्स झटपट गमावल्या होत्या. मात्र, ग्रेस हॅरिस आणि सोफी एक्लेस्टोन यांनी शानदार फलंदाजी करताना ८ व्या विकेटसाठी 70 धावांची नाबाद भागीदारी करत अटीतटीच्या लढतीत युपीचा विजय निश्चित केला होता. ग्रेस हॅरिसने 7 चौकार आणि 3 षटकारांसह 26 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी केली, तर सोफीने 12 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारांसह 22 धावांची नाबाद खेळी केली.

युपीचा हा या स्पर्धेतील पहिला विजय होता. त्यामुळे युपीने स्पर्धेची विजयी सुरवातही केली आहे. मात्र गुजरातला या स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com