India Women vs Ireland Women: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 वर्ल्डकपमधील साखळी फेरी आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत कोणते चार संघ जागा मिळवणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघांनी उपांत्य फेरीतील जागा पक्की केली आहे, त्यामुळे आता आणखी दोन संघांनाच उपांत्य फेरीत जागा मिळणार आहे.
दरम्यान, भारतीय महिला संघाला सोमवारी आयर्लंडविरुद्ध या स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना खेळायचा आहे. हा सामना भारतासाठी उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी महत्त्वाचा आहे. हा सामना भारतीय संघाने जिंकला, तर उपांत्य फेरीत प्रवेश करणारा भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यानंतरचा तिसरा संघ ठरेल.
मात्र, भारतीय संघ हा सामना पराभूत झाला, तर भारतीय संघाला इंग्लंड आणि पाकिस्तान संघात 21 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यावर अवलंबून राहावे लागेल.
सध्या ग्रुप बीमध्ये इंग्लंड 6 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे, तसेच भारतीय संघ 4 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिजचेही 4 गुण असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तान 2 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच आयर्लंडने आत्तापर्यंत एकही विजय न मिळवल्याने ते अखेरच्या क्रमांकावर असून त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपले आहे.
दरम्यान, भारत, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान हे तिन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. आता जर भारताने आयर्लंडला पराभूत केले, तर भारताच्या विजयासह वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचे आव्हान संपणार आहे. कारण भारताचे 6 गुण होतील.
वेस्ट इंडिजचे सर्व साखळी सामने खेळून झाले आहे, त्यामुळे ते 4 गुणांच्या पुढे जाणार नाहीत. तसेच पाकिस्तानने इंग्लंडला पराभूत केले, तरी ते 4 गुणांपर्यंतच पोहचू शकतात.
पण, जर आयर्लंडने भारताला हरवण्याचा पराक्रम केला, तर मात्र नेटरनरेट महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच जर पाकिस्तानने 21 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात इंग्लंडला पराभूत केले आणि भारतही आयर्लंडविरुद्ध पराभूत झाला, तर भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या तिन्ही संघांचे 4 पाँइंट्स होतील आणि अशा परिस्थितीत नेट रनरेटवर निकाल लागून एक संघ उपांत्य फेरीत दाखल होईल.
दरम्यान, ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने चारही साखळी सामने जिंकून अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे ग्रुप बी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहाणारा संघ गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 23 फेब्रुवारी रोजी उपांत्य सामना खेळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.