Suryakumar Yadav: टी20 मधील 'मिस्टर 360' वनडेत फ्लॉप! सूर्याचं चूकतंय कुठे? जाणून घ्या 4 महत्त्वाचे मुद्दे

सूर्यकुमार यादव टी20 क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये असला, तरी वनडेत संघर्ष करताना दिसत आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak

Suryakumar Yadav: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. या संपूर्ण मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीबरोबर सूर्यकुमार यादवचे अपयश देखील चर्चेत राहिले.

सूर्यकुमार या मालिकेत सपशेल अपयशी ठरला. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये धावा करता आल्या नाही. मुंबई आणि विशाखापट्टणमला झालेल्या वनडे सामन्यांमध्ये तो मिचेल स्टार्कविरुद्ध त्याचा पहिलाच चेंडू खेळताना पायचीत बाद झाला, तर चेन्नईला झालेल्या अखेरच्या वनडे सामन्यात ऍश्टन एगारविरुद्ध पहिलाच चेंडू खेळताना त्रिफळाचीत झाला.

त्यामुळे सूर्यकुमारवर सलग तीन वनडे सामन्यांमध्ये गोल्डन डक होण्याची नामुष्की ओढावली. पण टी20 क्रिकेटमध्ये सुपरस्टार ठरलेला सूर्यकुमार अचानक वनडेत असा अपयशी कसा ठरला असा अनेकांना प्रश्न पडला. त्यामुळे त्याच्या वनडेतील अपयशामागच्या कारणांचा थोडक्यात आढावा घेऊ.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav: 'सूर्य उगवलाच नाही', सलग तिसऱ्यांदा SKY गोल्डन डक झाल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

1. डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध संघर्ष

सूर्यकुमार प्रतिभाशाली फलंदाज असला, तरी तो डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध नजीकच्या काळात संघर्ष करताना दिसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही वनडेत देखील तो डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध बाद झाला. स्टार्क हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे, तर ऍश्टन एगार डावखुरा फिरकीपटू आहे.

सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 20 वेळा डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध विकेट गमवली आहे. यामध्ये 11 वेळा त्याला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी आणि 9 वेळा फिरकीपटूंनी बाद केले आहे. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याची सरासरीही कमी होते.

2. क्रिकेट प्रकारानुसार फलंदाजी शैली बदलण्यात अपयश

सूर्यकुमार टी20 क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम खेळाडू आहे, यात कोणतीही शंका नाही. त्याने 2022 मधील आयसीसीचा सर्वोत्तम टी20 क्रिकेटपटूचा पुरस्कारही जिंकला. तसेच तो आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा टी20 फलंदाजही आहे. मात्र, जेव्हा क्रिकेट प्रकार बदलतो त्यानुसार सूर्यकुमारला फलंदाजी शैली बदलणे कठीण जात असल्याचे दिसले आहे.

त्याच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीचा विचार केला, तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने 48 सामने खेळले असून 3 शतके आणि 13 अर्धशतकांसह 46.52 च्या सरासरीने 1675 धावा केल्या आहेत.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav: टीम इंडियातून सूर्याचा पत्ता होणार कट? कॅप्टन रोहित म्हणतोय, 'आधीही सांगितलं...'

तसेच वनडे क्रिकेटमध्ये त्याने 23 सामने खेळले असून त्याने या क्रिकेटप्रकारात जवळपास टी२० पेक्षा अर्ध्या सरासरीने म्हणजेच 24.05 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने वनडेत अवघ्या 2 अर्धशतकांसह 433 धावा केल्या आहेत.

प्रत्येक क्रिकेट प्रकाराची फलंदाजांकडून वेगवेगळी मागणी असते. त्यामुळे त्यानुसार फलंदाजाला आपल्या फलंदाजीत बदल करत खेळावे लागते. म्हणूनच विविध प्रकार खेळताना क्रिकेटपटूंची कसोटी लागते. पण यातच सूर्यकुमार अपयशी ठरताना दिसत आहे.

टी20 क्रिकेटमध्ये फलंदाजाला आक्रमण करत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करण्याची गरज असते, पण त्याचवेळी वनडे क्रिकेटमध्ये एखादी खेळी कौशल्याने उभी करावी लागते.

  • संधीतील अनियमितता

पण गेल्या दोन वर्षात सूर्यकुमार सर्वाधिक टी20 क्रिकेट खेळताना दिसला आहे. हा देखील एक मुद्दा आहे, ज्यामुळे तो अन्य क्रिकेटप्रकारात अपयशी ठरताना दिसतोय. साल 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या सूर्यकुमारला भारताकडून ज्या प्रमाणात टी20 क्रिकेटमध्ये संधी मिळाली, त्या तुलनेत त्याला वनडेमध्ये सातत्याने संधी मिळालेली नाही. कदाचीत त्यामुळे त्याला वनडेत स्थिरावणे कठीण जात असावे.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav उतरला गल्ली क्रिकेट खेळायला! आयकॉनिक सुपला शॉटनं वेधलं लक्ष, पाहा Video

त्याचबरोबर टी20 क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीचा क्रम जवळपास पक्का आहे, मात्र वनडेच्या बाबतीत तसे दिसून येत नाही. त्याने वनडेत आत्तापर्यंत 23 सामन्यांमध्येच पाच वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 11 वेळा पाचव्या, 5 वेळा चौथ्या, 3 वेळा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. तर तिसऱ्या आणि सातव्या क्रमांकावर प्रत्येकी 1 वेळा फलंदाजी केली.

त्याने टी20 क्रिकेटमध्ये 4 क्रमांकावर फलंदाजी केली आहे, पण सर्वाधिक 28 वेळा तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आहे, तर 10 वेळा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आहे. तसेच पाचव्या आणि दुसऱ्या क्रमांकावर त्याने प्रत्येकी 4 वेळा फलंदाजी केली आहे. त्यामुळे फलंदाजी क्रमांकही निश्चित नसल्याचा फटका त्याला वनडेत बसत असू शकतो.

3. तांत्रिक समस्या

क्रिकेटमध्ये अनेकदा जेव्हा खेळाडू अपयशी ठरतो, तेव्हा त्यामागे मानसिक कारण असण्याची शक्यता अधिक असते. पण सूर्यकुमारच्या बाबतीत त्याच तंत्रही काही प्रमाणात वनडेतील त्याच्या अपयशामागील कारण ठरत आहे.

सूर्यकुमारचा स्टान्स हा खुला असतो. तसेच त्याला मागे जाऊन खेळणे पसंत आहे. त्यामुळे त्याला पायचीत करणे अधिक सोपे जाते. विशेषत: इनस्विंग गोलंदाजीवर तो या स्टान्ससह अडचणीत येऊ शकतो. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुंबई आणि विशाखापट्टणम वनडेत स्टार्कने त्याला एकाच प्रकारे म्हणजेच इनस्विंग गोलंदाजी करत पायचीत पकडले होते.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav ची टीम इंडियात रेकॉर्डब्रेक एन्ट्री! कसोटी पदार्पण ठरले ऐतिहासिक

विशाखापट्टणम वनडेनंतर सुनील गावसकरांनीही सूर्यकुमारबद्दल बोलताना म्हटले होते की त्याला प्रशिक्षकांशी चर्चा करणे गरजेचे आहे.

त्यांनीही म्हटले होते की 'सूर्यकुमारचा स्टान्स खुला आहे, हा स्टान्स टी20 क्रिकेटसाठी योग्य ठरू शकतो, कारण कोणताही चेंडू ओव्हरपीच झाला, तर त्यावर फ्लिकचा फटका खेळत षटकार मारता येऊ शकतो. पण वनडेत जेव्हा पायाजवळ चेंडू पडतो, त्यावेळी बॅट ऍक्रॉस जाण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे जेव्हा चेंडू आत स्विंग करत येतो, तेव्हा त्याला संघर्ष करावा लागेल. त्यामुळे त्याला प्रशिक्षकांबरोबर काम करावे लागेल.'

याशिवाय सूर्यकुमारला वनडेत खेळताना थोडं संयमही ठेवावा लागणार आहे. सुरुवातीला गोलंदाजी समजून घेऊन थेट आक्रमण करण्यापूर्वी संयम ठेवून खेळून पाहावे लागेल. ज्याचा फायदा त्याला होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com