India vs Australia, 1st test: भारतीय क्रिकेट संघ नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. 9 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या सामन्यातून मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत यांनी पदार्पण केले. दरम्यान, सूर्यकुमारने पदार्पण करताच एक मोठा विक्रमही नावावर केला आहे.
सूर्यकुमारने 9 फेब्रुवारी 2023 रोजी जेव्हा कसोटी पदार्पण केले, त्यावेळी त्याचे वय 32 वर्षे 148 दिवस इतके होते. त्यामुळे तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात वयाच्या तिशीनंतर पदार्पण केले आहे.
त्याने सर्वात आधी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 14 मार्च 2021 रोजी इंग्लंडविरुद्ध अहमदाबादला आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण केले होते. त्यावेळी त्याचे वय 30 वर्षे 181 दिवस होते. तसेच नंतर त्याने 18 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे वनडे पदार्पण केले. त्यावेळी त्याचे वय 30 वर्षे 307 दिवस होते.
दरम्यान, सूर्यकुमारने वयाची 30 वर्षे पार केल्यानंतर जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले असले तरी त्याची आत्तापर्यंतची कामगिरी चांगली झाली आहे. विशेषत: आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये.
महत्त्वाचे म्हणजे त्याने 2022 सालचा आयसीसीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटपटूचा पुरस्कारही पटकावला आहे. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 48 सामन्यांमध्ये 1675 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 3 शतकांचा आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच त्याने 20 वनडे सामने खेळताना 433 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
(Suryakumar Yadav become first Indian cricketer to make debut in all three formats after crossing age of 30)
शास्त्रींच्या हस्ते मिळाली पदार्पणाची कॅप
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून पदार्पण करणारा सूर्यकुमार भारताकडून कसोटी खेळणारा 304 वा खेळाडू ठरला आहे. त्याला त्याच्या कसोटी पदार्पणापूर्वी भारताची कसोटीची 304 क्रमांची कॅप भारताचे माजी प्रशिक्षक आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते देण्यात आली.
तसेच त्याच्याबरोबरच नागपूर कसोटीतून पदार्पण करणाऱ्या केएस भरतला पदार्पणाची कॅप चेतेश्वर पुजाराने प्रदान केली. केएस भरत भारताकडून कसोटी पदार्पण करणारा 305 वा खेळाडू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.