Mohammad Shami: शमीने 5 विकेट्सनंतर का फिरवला डोक्यावर चेंडू? गिलने उलगडले रहस्य

India vs Sri Lanka World Cup: श्रीलंकेविरुद्ध शमीने 5 विकेट्स घेतल्यानंतर डोक्यावरून चेंडू का फिरवला होता, याचे कारण शुभमन गिलने स्पष्ट केले आहे.
Mohammad Shami
Mohammad Shami

Why Mohammad Shami rolled Ball over head after 5 wickets during India vs Sri Lanka In ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारताने श्रीलंकेविरुद्ध 302 धावांनी मोठा विजय मिळवला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मिळवलेला हा विजय भारताचा या स्पर्धेतील सलग सातवा विजय ठरला. त्यामुळे भारताने उपांत्य फेरीतही स्थान पक्के केले आहे.

भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 5 षटके गोलंदाजी करताना 18 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

शमीने 5 विकेट्स घेण्याची ही यंदाच्या स्पर्धेतील दुसरी वेळ आहे. त्याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत अवघे तीनच सामने खेळले असून यात 14 विकेट्स घेतल्या आहेत.

Mohammad Shami
World Cup 2023: द. आफ्रिकेच्या विजयाने पाकिस्तानच्या उंचावल्या आशा! जाणून घ्या 9 संघांसाठी सेमीफायनलचे समीकरण

गुरुवारी झालेल्या सामन्यावेळी जेव्हा शमीने कसून रजिताला बाद करत 5 विकेट्स पूर्ण केल्या, त्यानंतर त्याने चेंडू त्याच्या डोक्यावर गोल फिरवत सेलिब्रेशन केले. त्याने हे सेलिब्रेशन का केला, असा प्रश्न अनेकांना पडला.

दरम्यान, सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शुभमन गिलने यामागील कारण स्पष्ट केले. त्याने सांगितले की 'शमीचे ते हावभाव आमच्या गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांच्यासाठी होते, कारण त्याच्या डोक्यावर केस नाहीत.'

पारस हे नोव्हेंबर 2021 पासून भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे.

ते याआधी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही राहुल द्रविडसह कार्यरत होते. पण नंतर 2021 मध्ये द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी, तर म्हाम्ब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Mohammad Shami
World Cup 2023: भारत सातव्या विजयासह सेमीफायनलमध्ये! श्रीलंकेला तब्बल 302 धावांनी पाजलं पराभवचं पाणी

भारताचा विजय

गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या होत्या. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 92 धावा केल्या, तर विराट कोहलीने 88 धावांची आणि श्रेयस अय्यरने 82 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना दिलशान मदुशंकाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकात 55 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून कसून रजिताने 14 धावा, महिश तिक्षणाने नाबाद 12 धावा आणि अँजेलो मॅथ्युजने 12 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. श्रीलंकेचे 5 फलंदाज शुन्यावर बाद झाले.

भारताकडून मोहम्मद शमीव्यतिरिक्त मोहम्मद सिराजने 3 विकेट्स, तर जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com