Pelé in India: जेव्हा पेलेंनी भारतात सामना रंगवला होता...

पेले काही वर्षांपूर्वी कोलकाता येथे सामना खेळले होते.
Pelé in India
Pelé in IndiaDainik Gomantak

Pelé: ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले. ते गेल्या काही काळापासून कर्करोगाचा सामना करत होते. तसेच त्यांची प्रकृतीही मागील काही दिवसात खालावली होती. अखेर त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पेले यांना केवळ ब्राझीलमध्येच नाही, तर जगभरात लोकप्रियता मिळाली होती.

पेले यांना फुटबॉलचा देव असंही संबोधले जायचे. अशा या फुटबॉल सम्राटाचे अनेक चाहते भारतातही आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी भारतातील लोकांना त्यांची झलक पाहाण्याची संधीही मिळाली होती. त्यांनी दोनवेळा भारत दौरा केला होता.

Pelé in India
Pelé: वयाच्या 17 व्या वर्षीच विश्वविजेता ते फुटबॉलचा देव

कोलकात्यात खेळलेला सामना

ही गोष्ट आहे 1977 सालची. जेव्हा पेले न्यूयॉर्क कॉसमॉस संघासाठी खेळत होते. त्यावेळी न्यूयॉर्क कॉसमॉस संघ एक सामना खेळण्यासाठी कोलकात्याला आला होता. त्या संघात पेले हे देखील होते. हा सामना कोलकात्यातील इडन गार्डन्सवर होणार होता.

ज्यावेळी लोकांना हे कळालं होतं की पेले कोलकात्यात खेळणार आहे, त्यावेळी इडन गार्डन्स खचाखच भरले होते. जवळपास ८० हजारांहून अधिक लोक सामना पाहाण्यासाठी आले होते, असे म्हटले जाते.

न्यूयॉर्क कॉसमॉसचा हा सामना झालेला मोहन बगान या बंगालमधील फुटबॉल क्लबविरुद्ध खेळला होता. महत्त्वाचे म्हणजे हा सामना चांगलाच अटीतटीचाही झालेला. सामन्याचा दिवस होता 24 सप्टेंबर 1977. हा सामना त्यावेळी मोहन बगानचे महासचिव असणाऱ्या धिरेन डे यांच्या प्रयत्नांमुळे झाला होता.

त्या सामन्यात पेलेंनी सुरुवातीपासूनच चांगला खेळ सुरू केला होता. पण मोहन बगानच्या खेळाडूंनी त्यांना घेरायला सुरुवात केली.

Pelé in India
Football legend Pele Passed Away : महान फुटबॉलपटू पेलेने वयाच्या 16 व्या वर्षीच केला होता पहिला गोल

मोहन बगानच्या फुटबॉलपटूंनी पेले यांना गोल करूच दिला नाही. त्यावेळी सामन्याच्या 17 व्या मिनिटाला न्यूयॉर्क कॉसमॉस संघाकडून कार्लोस अल्बेर्टोने पहिला गोल नोंदवलेला. पण न्यूयॉर्क कॉसमॉसची ही आघाडी फार काळ टिकली नाही आणि मोहन बगानकडून शाम थापाने पहिला गोल केला. त्यानंतर पहिल्याच हाफमध्ये अकबरने मोहन बगानसाठी दुसरा गोलही केला.

त्यामुळे पहिल्या हाफनंतर मोहन बगान आघाडीवर होते. दुसऱ्या हाफमध्येही मोहन बगानने न्यूयॉर्क कॉसमॉसला तगडी लढत दिलेली. मात्र एका पेनल्टीवर चांगालिने गोल करत न्यूयॉर्क कॉसमॉसला बरोबरी साधून दिली. पण ही पेनल्टी वादग्रस्त ठरली होती. त्यावर काही वादही झाले. मात्र सामना 2-2 अशा बरोबरीसह सुटला होता.

दरम्यान, या सामन्याची चर्चा त्यावेळी खूप झालेली. त्यानंतरही अनेकवर्ष या सामन्याची आठवण काढली गेली. आजही या सामन्याबद्दल कोलकातामधील अनेक लोक चर्चा करतात. पेलेंसाठी तो काळ त्यांच्या कारकिर्दीतील उत्तरार्धातील काळ होता. त्यावेळी ते तीन वर्ल्डकप जिंकलेही होते. असा एक खेळाडू भारतात येऊन खेळतो, म्हटल्यावर लोकांनी त्यांना पाहाण्यासाठी गर्दी करत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले होते. त्या प्रेमाने पेलेही भारावले होते.

तब्बल 38 वर्षांनंतर पेलेंचा दुसरा भारत दौरा

त्यानंतर पेले तब्बल 38 वर्षांनी भारतात आले. ऑक्टोबर 2015 मध्ये ते भारतात आले होते. त्यावेळी ते जवळपास एक आठवडा भारतात होते. त्यांनी इंडियन सुपर लीगमधील काही सामनेही पाहिले होते. ते भारताचा माजी क्रिकेट कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली यालाही भेटले होते.

पेले हे त्या दौऱ्यात बंगालमधील दुर्गा पुजेतही सामील झाले होते. त्यानंतर एका कार्यक्रमात पेले यांनी असेही सांगितलेले की भारतातील लोक मला आवडतात. म्हणून मी इथे येण्याचे आमंत्रण स्विकारले.

पेले यांनी त्यांच्या कारकिर्दीत 1363 सामन्यांत 1281 गोल केले असल्याचीही नोंद आहे. हा विश्वविक्रमही आहे. त्यांनी ब्राझीलकडून 1958, 1962 आणि 1970 साली वर्ल्डकप जिंकला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com