Retired Hurt and Retired Out difference:
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात बुधवारी (17 जानेवारी) टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने दोन सुपर ओव्हरनंतर विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली.
मात्र, या सामन्याच्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाला की रिटायर्ड आऊट याबाबात गोंधळ झाला.
झाले असे की पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 17 धावांचा पाठलाग करताना भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या 5 चेंडूत 15 धावा केल्या होत्या. अखेरच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. यावेळी अचानक रोहित माघारी परतला.
त्यावेळी रोहित रिटायर्ड आऊट झाल्याचे म्हटले गेले, मात्र पहिली सुपर ओव्हरही बरोबरीत सुटल्यानंतर तो दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा फलंदाजीला आला. त्यामुळे वादाला सुरुवात झाली.
कारण नियमानुसार पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झालेले खेळाडू दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे रोहित नक्की रियायर्ड आऊट झाला होता की रिटायर्ड नॉट-आऊट/हर्ट होता, याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, अनेकांना माहित नसेल की रियायर्ड आऊट की रिटायर्ड नॉट-आऊट/हर्ट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे नियम नक्की काय आहेत, याबद्दल जाणून घेऊ.
क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेरिलबन क्रिकेट क्लबने फलंदाजाच्या रिटायर होण्याबाबतही काही नियम बनवले आहेत. एमसीसीच्या नियम क्रमांक २५.४ मध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
नियमानुसार फलंदाज एखादा चेंडू पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी रिटायर होऊ शकतो, पण त्याबाबत त्याने पंचांना माहिती देणे आवश्यक असते. असे न झाल्यास पंच त्या फलंदाजाला बाद देऊ शकतात. तसेच तो फलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराच्या संमतीशिवाय पुन्हा फलंदाजीला उतरू शकत नाही.
तसेच जर फलंदाज आजारामुळे, दुखापतीमुळे किंवा कोणत्याही टाळता न येणाऱ्या कारणामुळे रिटायर झाला असेल, तर तो पुन्हा फलंदाजीला उतरू शकतो. मात्र, जर अशा परिस्थिती रिटायर झालेला फलंदाज पुन्हा फलंदाजीला आला नाही, तर त्याला रिटायर्ड नॉट आऊट/हर्ट समजले जाते.
दरम्यान, रिटायर्ड हर्ट झालेला फलंदाज पुन्हा तेव्हाच फलंदाजीला येऊ शकतो, जेव्हा त्याच्या संघाची एखादी विकेट जाते.
याशिवाय जर एखादा फलंदाज कोणत्याही आजाराशिवाय, दुखापतीशिवाय किंवा टाळता न येणाऱ्या कारणाशिवाय रिटायर होत असेल, तर त्याला पुन्हा फलंदाजीला उतरण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराची संमती घेणे गरजेचे असते. जर प्रतिस्पर्धी संघाने त्यासाठी नकार दिला तर तो फलंदाजीला येऊ शकत नाही.
तसेच अशा परिस्थितीत जर रिटायर झालेल्या खेळाडूने पुन्हा फलंदाजी केली नाही, तर त्याला रिटायर्ड आऊट घोषित केले जाते.
साधारणपणे अशाप्रकारे फलंदाज रिटायर तेव्हा होतात, जेव्हा ते फलंदाजी करताना संघर्ष करतात आणि संघाला आक्रमक खेळायचे असते. अशावेळी ते रिटायर्ड आऊट होतात आणि दुसऱ्या फलंदाजाला फलंदाजीला येण्याची संधी देतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.