IND vs AFG: टाय, रोहितचं शतक अन दोन सुपर ओव्हर...; तिसऱ्या T20 सामन्यातील 5 महत्वाच्या गोष्टी

India vs Afghanistan, 3rd T20I: भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील बंगळुरूला झालेला तिसरा टी20 सामना अत्यंत रोमांचक झाला. या सामन्यात दोन सुपर ओव्हरनंतर भारताने विजय मिळवला.
India vs Afghanistan
India vs AfghanistanPTI
Published on
Updated on

India vs Afghanistan 3rd T20I Match at Bengaluru

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात बुधवारी (17 जानेवारी) टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. शेवटपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात काही अनोख्या गोष्टी घडल्या. त्याचाच घेतलेला हा आढावा.

रोहित शर्माचे विश्वविक्रमी शतक

या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र भारताने ५ षटकांच्या आतच २२ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. पण यानंतर सलामीला आलेल्या कर्णधार रोहित शर्माने रिंकू सिंगला साथीला घेत भारताचा डाव सावरला. त्याने आक्रमक फलंदाजी करत शतक साजरे केले.

त्याचबरोबर रिंकू सिंगबरोबर (69*) पाचव्या विकेटसाठी नाबाद 190 धावांची विक्रमी भागीदारी रचली. रोहितने 69 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 121 धावा केल्या.

रोहितचे हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील पाचवे शतक आहे. त्यामुळे रोहित आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 5 शतके करणारा पहिला खेळाडू ठरला. त्याच्या आणि रिंकू सिंगच्या भागीदारीमुळे भारताने या सामन्यात 20 षटकात 4 बाद 212 धावा उभारल्या.

अफगाणिस्तानची सर्वोच्च धावसंख्या

भारतीय संघाने दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने शानदार खेळ केला. अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती. यावेळी त्यांना 18 धावा काढता आल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

अफगाणिस्तानने 20 षटकात 6 बाद 212 धावा केल्या. ही अफगाणिस्तानची भारताविरुद्धची आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. अफगाणिस्तानकडून रेहमनुल्लाह गुरबाज (50), इब्राहिम झद्रान (50), गुलबदीन नायब (55*) यांनी अर्धशतके केली.

बरोबरीत सामना

दोन्ही संघांनी निर्धारित 20-20 षटकानंतर 212 धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना बरोबरीचा झाला. भारतीय पुरुष संघाची आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सामना बरोबरी सुटण्याची ही पाचवी वेळ होती. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या चारही सामने भारताने जिंकले आहेत.

पाकिस्तानविरुद्ध 2007 साली बरोबरी झालेल्या टी20 सामन्यात भारताने बॉल आऊटमध्ये विजय मिळवला होता, तर नंतर 2020 मध्ये दोनदा आणि 2022 मध्ये एकदा न्यूझीलंडविरुद्ध भारताचे टी20 सामने बरोबरीत सुटले होते. त्या तिन्ही वेळेत भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवले होते.

India vs Afghanistan
IND vs AFG: दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 'बिश्नोई'ची कमाल; टीम इंडियाने नोंदवला रोहमहर्षक विजय!

दोन सुपर ओव्हर

या सामन्यात निर्धारित 20-20 षटकात बरोबरी झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण पहिल्या सुपर ओव्हरमध्येही 16-16 अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने 11 धावा केल्या, तर 12 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 1 धावच करता आली, पहिल्या तीन चेंडूतच त्यांनी दोन विकेट्स गमावल्या. त्यामुळे हा सामना भारताने जिंकला. दरम्यान, दोन सुपर ओव्हर होण्याची आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील ही पहिलीच वेळ ठरली.

भारताने दिला व्हाइटवॉश

भारताने तिसरा टी20 सामना जिंकल्याने मालिकेत 3-0 असा विजय मिळवला. दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान संघात झालेली ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. आत्तापर्यंत अफगाणिस्तानला भारताविरुद्ध एकदाही टी२० क्रिकेटमध्ये विजय मिळवता आलेला नाही.

तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी20 मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला व्हाइटवॉश देण्याची ही सहावी वेळ होती. त्यामुळे तो सर्वाधिकवेळा टी20 मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला व्हाइटवॉश देणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com