Virat Kohli One-handed stunning catch: गुरुवारी (27 जुलै) बार्बाडोसमधील ब्रिजटाउन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. याबरोबरच विराट कोहलीने घेतलेल्या एका झेलानेही सर्वांची वाहवा मिळवली.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा भारतीय गोलंदाजांनी चांगला फायदा उचलला. यादरम्यान 18 व्या षटकात रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर विराटने वेस्ट इंडिजच्या रोमारियो शेफर्डचा शानदार एकहाती झेल घेतला.
झाले असे की 18 व्या षटकात जडेजाने फुल लेंथवर चौथा चेंडू टाकला. त्याच्या या चेंडूवर शेफर्डने पुढे येऊन लाँग ऑफला शॉटवर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटची बाहेरची कड घेऊन मागे गेला.
यावेळी दुसऱ्या स्लीपमध्ये विराट कोहली क्षेत्ररक्षण करत होता. त्याने त्याच्या उजव्या बाजूला सूर मारत एका हाताने झेल पकडला. त्याचा हा झेल पाहून शेफर्डसह भारतीय खेळाडूही चकीत झाले. पण त्याने झेल घेताच भारतीय संघाने सेलिब्रेशन केले. शेफर्ड भोपळाही न फोडला शुन्यावर बाद झाला.
सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास वेस्ट इंडिजचा संघ 23 षटकातच 114 धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाय होपने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. बाकी कोणाला खास काही करता आले नाही.
भारताकडून कुलदीप यादवने सर्वधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 22.5 षटकात पूर्ण केला. भारताकडून इशान किशनने 46 चेंडूत 52 धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने 19 धावा, रविंद्र जडेजाने नाबाद 16 धावा आणि रोहित शर्माने नाबाद 12 धावा केल्या. याशिवाय शुभमन गिल (7), हार्दिक पंड्या (5) आणि शार्दुल ठाकूर (1) स्वस्तात बाद झाले.
वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने 2 विकेट्स घेतल्या, तर जेडेन सील्स आणि यानिक कॅरिया यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.