Ishan Kishan reveal that Virat Kohli backed him to bat at number four:
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ओव्हल मैदानात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने वर्चस्व ठेवल्याचे दिसून आले. याच सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने त्याच्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले.
चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजचा पहिला डाव 255 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ 183 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात फलंदाजसाठी उतरला. भारताने दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजीचा पवित्रा स्विकारला होता. सलामीवीर रोहित शर्मा 44 चेंडूत 57 धावा करून बाद झाला, तर यशस्वी जयस्वाल 30 चेंडूत 38 धावा करून बाद झाला.
जयस्वाल बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला येईल, असे वाटले होते. पण तसे न होता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिलला साथ देण्यासाठी इशान किशन उतरला. हे दोघे नंतर भारताने डाव घोषित करेपर्यंत नाबाद राहिले.
यावेळी इशानने आक्रमक फलंदाजी करताना 34 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 52 धावांची खेळी केली. दरम्यान, चौथ्या दिवसाच्या खेळानंतर डावखुरा फलंदाज इशानने खुलासा केला की विराट कोहलीनेच त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठिंबा दिला होता.
साधारणत: कसोटीत भारताकडून विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याने याच सामन्यात पहिल्या डावात भारताकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 121 धावांची शतकी खेळी केली होती.
दरम्यान, चौथ्या दिवसाच्या खळानंतर इशान म्हणाला, 'अर्धशतकी खेळी करणे, खरंच चांगले होते. मला माहित होते की माझ्याकडून संघाला काय हवे आहे. सर्वांनी मला पाठिंबा दिला. विराटने मला पाठिंबा दिला आणि सांगितले जा आणि तुझा नैसर्गिक खेळ कर. आशा आहे की आम्ही उद्या सामना संपवू.'
'तेव्हा विराट भाईनेच मला पुढाकार घेऊन सांगितले होते की मी फलंदाजीला जायला हवे. त्यावेळी स्लो लेफ्ट-आर्म बॉलिंग सुरू होती. त्यामुळे हा संघासाठी चांगला निर्णय होता. कधीकधी तुम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात. आमचा पावसानंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यावर 10-12 षटके फलंदाजी करण्याचा आणि 70-80 आणखी धावा करून 370-380 धावांचे आव्हान देण्याची योजना होती.'
या सामन्यात इशानने अर्धशतक केल्यानंतर लगेचच भारताने 2 बाद 181 धावांवर डाव घोषित करत पहिल्या डावातील 183 धावांच्या आघाडीच्या जोरावर वेस्ट इंडिजसमोर 365 धावांचे आव्हान ठेवले.
या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकात 2 बाद 76 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून तेजनारायण चंद्रपॉल 24 धावांवर आणि जर्मेन ब्लॅकवूड 20 धावांवर नाबाद खेळत आहेत.
वेस्ट इंडिजला अखेरच्या दिवशी विजयासाठी अद्याप 289 धावांची गरज आहे, तर भारताला 8 विकेट्सची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.