Shubman Gill and Yashasvi Jaiswal equals KL Rahul and Rohit Sharma's record during West Indies vs India, 4th T20I:
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू असून चौथा सामना शनिवारी (12 ऑगस्ट) फ्लोरिडाला खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत मालिकेतही 2-2 अशी बरोबरी साधली आहे.
भारताच्या विजयात शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी मोलाचा वाटा उचलला. याबरोबर या दोघांच्या जोडीने मोठा विक्रमही नोंदवला आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 179 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी सलामीला फलंदाजीला उतरली. या दोघांनीही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांच्या संयमाची परिक्षा पाहात तब्बल १६५ धावांची भागीदारी केली.
डावाच्या १६ व्या षटकात गिल 47 चेंडूत 77 धावा करून रोमारियो शेफर्डच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे त्याची आणि जयस्वालची सलामी भागीदारी तुटली. मात्र त्यांनी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या 5 वर्षांपूर्वीच्या विक्रमाला मागे टाकले.
जयस्वाल आणि गिल यांनी रचलेली 165 धावांची भागीदारी ही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी केलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.
त्यामुळे भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च भागीदारी करणाऱ्या जोड्यांच्या यादीत गिल आणि जयस्वाल यांनी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या जोडीची बरोबरी केली आहे. त्यांनी 22 डिसेंबर 2017 रोजी श्रीलंकेविरुद्ध इंदुरला झालेल्या टी20 सामन्यात सलामीला 165 धावांचीच भागीदारी केली होती.
दरम्यान भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च भागीदारी करणाऱ्या जोड्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित आणि शिखर यांच्या जोडीने 27 जून 2018 रोजी डब्लिनला आयर्लंडविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात 160 धावांची भागीदारी केली होती.
या यादीत अव्वल क्रमांकावर दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांची जोडी आहे. त्यांनी डब्लिनलाच 28 जून 2022 रोजी आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी केली होती.
शनिवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास भारताने गिल आणि जयस्वाल यांच्या भागीदारीच्या जोरावर 179 धावांचे आव्हान एक विकेट गमावत 17 षटकात सहज पूर्ण केले. जयस्वाल 51 चेंडूत नाबाद 84 धावांवर नाबाद राहिला. तसेच तिलक वर्मा 7 धावांवर नाबाद राहिला.
तत्पुर्वी, वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 178 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तसेच शाय होपने 45 धावा केल्या.
भारताकडून आर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेल, मुकेश कुमार आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.