MS Dhoni thanked all the fans: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अंतिम सामना पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 5 विकेट्सने विजय मिळवला आणि विजेतेपद आपल्या नावावर केले. यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने चाहत्यांसाठी केलेल्या कृतीने मनं जिंकली आहेत.
दरम्यान, हा अंतिम सामना रविवारी (28 मे) होणार होता. पण रविवारी अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस पडला. त्याचमुळे राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी हा सामना हलवण्यात आला होता. पण सोमवारी सामना सुरू असतानाही पावसामुळे जवळपास २ तास व्यत्यय आल्याने अखेर मध्यरात्री जवळपास 2 वाजताच्या सुमारात निकाल समोर आला.
पण असे असतानाही चाहत्यांचा उत्साह कमी झालेला नव्हता. मोठ्या संख्येत चाहते मैदानावर आले होते. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्सला विजेतेपदाची ट्रॉफी रात्री दिल्यानंतर संपूर्ण संघ जल्लोष करत होता.
पण धोनीने पुरस्कार सोहळा संपल्यानंतर जवळपास रात्री 3.30 वाजताच्या सुमारास मैदानाला एक चक्कर मारली आणि इतक्या उशिरापर्यंत थांबलेल्या चाहत्यांचे आभार मानले. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, या सामन्यात विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूत चेन्नईला १० धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने षटकार आणि चौकार ठोकत चेन्नईला विजेतेपद मिळवून दिले. यानंतर जडेजाला धोनीने उचलून घेतल्याचेही दिसले होते. या व्हिडिओलाही चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले.
दरम्यान, हे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सचे आयपीएलमधील पाचवे विजेतेपद ठरले आहे. त्याचबरोबर धोनीचे कर्णधार म्हणूनही हे पाचवे आयपीएल विजेतेपद आहे. त्यामुळे चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या 5 आयपीएल विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. चेन्नईने यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या वर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.