National Games Goa 2023: गोव्यातील व्हॉलिबॉलपटूंची निराशा; स्पर्धेत सहभाग नाही, महासंघाच्या अस्थायी समितीने घेतला निर्णय

National Games Goa 2023: स्पर्धा आयोजकांचीही मूक संमती; मुख्यमंत्री म्हणतात, आयोजनाची स्वप्नपूर्ती
CM Pramod Sawant And Sport Minister Govind Gaude
CM Pramod Sawant And Sport Minister Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

National Games 2023 Goa Update: गोव्यातील व्हॉलिबॉलपटू, तसेच बीच व्हॉलिबॉल खेळाडू जून-जुलैपासून भर पावसात, स्वखर्चाने 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचा इराद्याने अथक मेहनत घेत होते; परंतु आता भारतीय व्हॉलिबॉल महासंघाच्या अस्थायी समितीने गोव्यातील क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष व महिला व्हॉलिबॉल संघ निवडणे शक्य नसल्याचे कारण दिल्यामुळे हा खेळ बाद झाला असून स्पर्धेत नसेल, हे स्पष्ट झाले.

त्याचवेळी राष्ट्रीय स्पर्धा तांत्रिक आचार समितीचे (जीटीसीसी) अध्यक्ष अमिताभ शर्मा यांनीही त्यास अनधिकृतपणे मूक संमती दिली आहे. साहजिकच राज्यातील व्हॉलिबॉलपटूंच्या मेहनतीवर पाणी पडले आहे.

गोव्यातील व्हॉलिबॉलमध्ये दोन समांतर संघटना आहेत. त्यांच्यातील वादामुळे गोवा क्रीडा प्राधिकरणाने समर्पक निर्णय घेताना संघटनेवर प्रशासक नेमला व नव्याने निवड चाचणी प्रक्रिया घेऊन संघ निवडीच्या संभाव्य वादावर तोडगा काढला होता.

मात्र, आता महासंघाच्या अस्थायी समितीच्या निर्णयामुळे गोमंतकीय व्हॉलिबॉलपटू न खेळताच घरी परतण्याचे गुरुवारी जवळपास निश्चित झाले. दरम्यान, गोव्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यानंतर आयोजन लांबणीवर टाकण्याचा सपाटाच लावला.

गतवर्षी राज्यात होणारी ३६ वी स्पर्धा गुजरातला ऐनवेळी न्यावी लागली आणि ३७ व्या स्पर्धेचे यजमानपद मिळाले. अखेरीस गोव्यात होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा पडदा उघडला आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एकदाची स्वप्नपूर्ती झाली, असे सांगत मोकळा श्वास घेतला.

क्रीडा स्पर्धेचे अधिकृत उदघाटन २६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी बॅडमिंटन स्पर्धेला गुरुवारपासून ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरवात झाली.

CM Pramod Sawant And Sport Minister Govind Gaude
Syed Mushtaq Ali Trophy 2023: सिद्धार्थ, दर्शनचे झुंजार प्रयत्न तोकडे; गुजरातची गोव्यावर 15 धावांनी मात

सर्वाधिक फटका रामा धावसकरला

व्हॉलिबॉल महासंघाच्या अस्थायी समितीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका गोव्याचा आंतरराष्ट्रीय बीच व्हॉलिबॉलपटू रामा धावसकर याला बसणार आहे. रामा याने २०१५ साली केरळमध्ये, तर २०२२ साली गुजरातमध्ये बीच व्हॉलिबॉलचे ब्राँझपदक जिंकले.

आता तो नितीन सावंत याच्यासह स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेत होता. त्याचा फॉर्म पाहता सुवर्णपदकासह सलग तिसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याची धावसकरला नामी संधी होती.

रामा-नितीन जोडीकडे लक्ष

जुलैमध्ये चेन्नईत अस्थायी समितीने घेतलेली आशियाई क्रीडा स्पर्धेची राष्ट्रीय बीच व्हॉलिबॉल निवड चाचणी स्पर्धा रामाने नितीनसह जिंकली होती. मात्र आंतरराष्ट्रीय मानांकन नसल्याने त्याची आशियाई स्पर्धेत खेळण्याची संधी दुर्दैवाने हुकली.

त्यानंतर रामा-नितीन जोडीने बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण व रौप्यपदक जिंकले होते. आता ही जोडी वार्का येथे सुरू असलेल्या व्हॉलिबॉल बीच प्रो टूर स्पर्धेत थेट मुख्य फेरीत खेळत आहे.

  1. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या २६ रोजी होणाऱ्या उद्‍घाटनासाठी २५ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहू शकतात, अशी माहिती आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. स्पर्धेच्या आयोजनाचा तपशीलही यावेळी सादर करण्यात आला.

  2. या आयोजनासाठी जारी केलेल्या आदेशांना कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.

  3. त्‍यांनी सांगितले की, काहीजणांना सेवा मुदतवाढ देणे तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनासंदर्भातील विषय प्रामुख्याने मंत्रिमंडळासमोर होते. काही कामांचे आदेश जारी करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक होती, ती देण्यात आली.

CM Pramod Sawant And Sport Minister Govind Gaude
IND vs BAN: जबरदस्त! किंग कोहलीने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली मोठी कामगिरी

स्थानिकांवर अन्याय

क्रीडा स्पर्धेच्या बॅडमिंटन प्रकारात गोवा संघात परराज्यांतील खेळाडू खेळले, हा वाद सुरू असतानाच ‘साग’चे माजी कार्यकारी संचालक तथा कॉंग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी कडाडून टीका केली.

यामुळे ज्या गोमंतकीय खेळाडूंनी परिश्रम घेतले, जिद्दीने सराव केला, त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याची टीका गोम्स यांनी केली.

राज्य सरकारने सर्व कंत्राटे बाहेरच्या कंपन्यांना दिली आहेत. २०१३-१४ मधील लुसोफोनिया स्पर्धेनंतर सरकारला राज्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे शक्य झालेले नाही.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजिण्यामागचा हेतू गोमंतकीय खेळाडूंना संधी देणे, हा होता. तोच सफल झाला नसल्याचे गोम्स म्हणाले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनास १२ हजार लोकांची गर्दी स्टेडियमवर अपेक्षित आहे. सर्व तयारी उद्‍घाटनाच्या दोन दिवस अगोदर पूर्ण होईल. विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी २५० बालरथ तैनात असतील. गोव्यातील स्पर्धेत सर्वाधिक आशियाई पदक विजेते खेळाडू यावेत, यासाठी प्रयत्न आहेत.

गोविंद गावडे, क्रीडामंत्री

गोमंतकीय व्हॉलिबॉलपटूंसाठी मला खूप वाईट वाटतेय. यात खेळाडूंचा दोष काय आहे. आम्हाला राष्ट्रीय स्पर्धेत यंदा सुवर्णपदकाची संधी होती. ती हिरावली जाईल.

अर्विन सुवारिस, पदाधिकारी, गोवा व्हॉलिबॉल संघटना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com