

मेजर लीग सॉकरमधील इंटर मियामी आणि फिलाडेल्फिया युनियन यांच्यातील सामन्यात फुटबॉलपेक्षा कुस्तीच्या सामन्यासारखे दृश्य पाहायला मिळाले. सामना रंगतदार असतानाच अखेरच्या क्षणी खेळाडूंमध्ये झालेल्या धक्काबुक्कीने वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या घटनेदरम्यान इंटर मियामीचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी मैदानावर उपस्थित होता आणि त्याने प्रकरण शांत करण्याचा प्रयत्नही केला.
सामन्याच्या इंज्युरी टाइममध्ये म्हणजेच 101व्या मिनिटाला ही घटना घडली. इंटर मियामीच्या डिफेंडरने फिलाडेल्फिया युनियनच्या अवघ्या 16 वर्षांच्या कॅवन सुलिव्हनविरुद्ध बॉक्समध्ये टॅकल केले. या टॅकलनंतर सुलिव्हन मैदानावर कोसळला.
यानंतर इंटर मियामीचा इयान फ्रे सुलिव्हनजवळ पोहोचला. दोन्ही खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला आणि फ्रेने सुलिव्हनच्या डोक्याजवळ धक्का देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती अचानक नियंत्रणाबाहेर गेली.
फ्रेच्या कृतीनंतर कॅवन सुलिव्हनने त्याचा पाय पकडत त्याला हवेत उचलले आणि थेट जमिनीवर आपटले. काही क्षणांसाठी मैदानावरील दृश्य फुटबॉल सामन्यापेक्षा WWEच्या रिंगमधील लढतीसारखे दिसत होते.
दोन्ही खेळाडूंमध्ये झटापट सुरू असताना दोन्ही संघांतील इतर खेळाडूंनी धाव घेतली आणि त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद इथेच थांबला नाही.
कॅवन सुलिव्हनला इयान फ्रेपासून वेगळे करण्यात आल्यानंतर इंटर मियामीचा आणखी एक खेळाडू यानिक ब्राइट त्याच्याशी भिडला. दोघांमध्येही जोरदार धक्काबुक्की झाली. मैदानावरील परिस्थिती पाहता रेफरीला हस्तक्षेप करावा लागला.
परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्यानंतर रेफरीने कॅवन सुलिव्हन आणि यानिक ब्राइट या दोघांनाही रेड कार्ड दाखवले. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना मैदानाबाहेर जावे लागले.
आपल्या संघातील खेळाडूला रेड कार्ड मिळाल्यानंतर लिओनेल मेसीने रेफरीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मेसीने रेफरीसमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र रेफरीने आपला निर्णय कायम ठेवला. त्यामुळे मेसीच्या प्रयत्नांनंतरही रेड कार्डचा निर्णय बदलला नाही.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून, 16 वर्षीय कॅवन सुलिव्हनच्या कृतीने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान, इंटर मियामी आणि फिलाडेल्फिया युनियन यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत संपला. फिलाडेल्फियाने 11व्या मिनिटाला इंडियाना वासिलेव्हच्या गोलच्या जोरावर आघाडी घेतली. त्यानंतर 10व्या मिनिटाला डॅनियल पिंटरने इंटर मियामीला बरोबरी साधून दिली.
26व्या मिनिटाला लिओनेल मेसीने गोल करत इंटर मियामीला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्या हाफमध्ये फिलाडेल्फियाने पुनरागमन केले. 58व्या मिनिटाला नील पीयरेने गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला.
या सामन्यानंतर इंटर मियामीच्या विजयाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. संघाला सलग चार सामन्यांपासून विजय मिळवता आलेला नाही. 20 सामन्यांत 39 गुणांसह इंटर मियामी ईस्टर्न कॉन्फरन्समध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
मात्र, या सामन्यातील निकालापेक्षा अखेरच्या क्षणी झालेली खेळाडूंची झटापट अधिक चर्चेत आली आहे. मैदानावर घडलेल्या या प्रकारामुळे फुटबॉल सामन्यात WWEसारखे दृश्य पाहायला मिळाल्याची प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.