Heated arguments between Soumya Sarkar and Harshit Rana:
एमर्जिंग एशियन कप 2023 स्पर्धेत शुक्रवारी (21 जुलै) भारत अ आणि बांगलादेश अ संघात उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात भारताने 51 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. पण याच सामन्यात भारताच्या युवा खेळाडूची बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूशी शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.
कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा हर्षित राणा आणि बांगलादेशचा सौम्य सरकार यांच्यात बाचाबाची झाली. झाले असे की भारताने दिलेल्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशकडून सौम्य सरकार 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.
सौम्य सरकारला 26 व्या षटकात युवराज सिंग दोदियाने बाद केले. सौम्य सरकारचा शानदार झेल पहिल्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या निकिन जोसने पळत जाऊन डाईव्ह मारत पकडला. त्यानंतर सौम्य सरकार त्याच्या झेलबाबत साशंक होता. पण याचवेळी त्याच्यात आणि हर्षित राणा यांच्यात वादाला सुरुवात झाली.
हे दोघे एकमेकांशी वाद घालत असताना अखेर भारतीय संघातील खेळाडूंनी मध्यस्थी केली. त्यानंतर सौम्य सरकारला बाद देण्यात आल्याने त्याला 5 धावांवर बाद होत माघारी परतावे लागले.
या उपांत्य सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. भारताकडून कर्णधार यश धूलने 66 धावांची खेळी केली. तसेच अभिषेक शर्माने 34 धावांची खेळी केली.
याशिवाय कोणालाही 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यामुळे भारताचा डाव 49.1 षटकात 211 धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून मेहदी हसन, तांझिम हसन साकिब आणि रकिबुल हसन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 212धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला बांगलादेश संघ भारताच्या निशांत सिंधू आणि मानव सुतारच्या गोलंदाजीसमोर 34.2 षटकातच १६० धावांवर सर्वबाद झाला.
बांगलादेशकडून तांझिद हसनने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद नाईमने ३८ धावांची खेळी केली. बाकी कोणाला खास काही करता आले नाही.
भारताकडून निशांत सिंधूने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच मानव सुतारने ३ विकेट्स घेतल्या. तसेच अभिषेक शर्मा आणि युवराजसिंग दोदिया यांनी प्रत्येकी १ विकेट घेतील.
पाकिस्तानविरुद्ध अंतिम मुकाबला
भारत अ संघाने उपांत्या सामन्यात विजय मिळवल्याने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे २३ जुलैला अंतिम सामन्यात भारत अ आणि पाकिस्तान अ संघ आमने-सामने असणार आहेत. पाकिस्तान अ संघाने उपांत्य सामन्यात श्रीलंका अ संघाला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.