टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आज झालेल्या हॉकीच्या(Hockey) कांस्य पदकाच्या लढतीत भारताने (INDvsGER) इतिहास रचत विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये भारताने जगज्जेत्या जर्मनीला नमवत अखेर कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. आणि भारतीयांची चाळीस वर्षांची हॉकीच्या पदकाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या सामन्यात भारताने जर्मनीचा 5-4 असा पराभव केला आहे.
भारताने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकी पदक जिंकले आहे. यापूर्वी, भारताने वासुदेवन भास्करन यांच्या नेतृत्वाखाली 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आजच्या या रंजक सामन्यामध्ये सिमरनजीत सिंगने भारतासाठी दोन गोल केले, हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग आणि हार्दिक सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला आणि या सामन्यात संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
भारताने या सामन्यात खराब सुरुवात केली आणि जर्मनीने सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला गोल करून 0-1 अशी आघाडी घेतली होती . तैमूर ओरुजने जर्मनीसाठी हा गोल केला. पाचव्या मिनिटाला भारताला पुनरागमन करण्याची संधी मिळाली पण रुपिंदर पाल सिंगला पेनल्टी कॉर्नरमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले. पहिल्या क्वार्टरच्या समाप्तीनंतर जर्मनीने भारतावर 0-1 अशी आघाडी कायम राखली. मात्र, भारताचा गोलरक्षक श्रीजेशचे या क्वार्टरमध्ये काही चमकदार बचाव पाहायला मिळाले.
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताने शानदार पुनरागमन केले आणि 17 व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगच्या शानदार मैदानी गोलमुळे सामना 1-1 बरोबरीत आणला. परंतु यानंतर जर्मनीने भारतीय बचावावर दबाव आणण्यास सुरुवात केली आणि दोन मिनिटांच्या अंतरात दोन गोल करत भारतावर 3-0 अशी आघाडी घेतली.
हार्दिक सिंहने या सामन्यात भारताला तिसऱ्या क्वार्टरमध्ये पुनरागमन करत आणि 26 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर करून स्कोर 2-3 केला. यानंतर भारताने पुन्हा एकदा शानदार पुनरागमन केले आणि जर्मनीच्या बचावावर सतत दबाव ठेवला. 28 व्या मिनिटाला त्याला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, यावेळी हरमनप्रीत सिंगच्या ड्रॅग फ्लिकने भारताला 3-3 ने बरोबरीत रोखले.
रुपिंदर पाल सिंगने 31 व्या मिनिटाला भारतासाठी चौथा गोल केला. रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर हा गोल करत संघाला 4-3 ने पुढे केले. तीन मिनिटांनंतर, 34 व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने शानदार मैदानी गोल करत भारताला या सामन्यात 5-3 अशी आघाडी मिळवून दिली.
चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीपासूनच जर्मनीने आक्रमक हॉकी खेळून भारतावर दबाव आणण्यास सुरुवात केली. जर्मनीने चौथा गोल करत पुन्हा एकदा हा सामना 5-4 च्या स्कोअरसह रोमांचक वळणावर आणला.पण अखेर शेवटी भारताने हा सामना 5-4 ने जिंकत इतिहास रचला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.