Sania Nehwal Thailand Open: इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर्सच्या खराब कामगिरीनंतर आता सर्व खेळाडूंच्या नजरा काही दिवसांत सुरु होणाऱ्या थायलंड ओपन स्पर्धेकडे लागल्या आहेत. या स्पर्धेत जगभरातील शटलर्स सहभागी होणार आहेत.
परंतु त्याआधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरे तर अनेक भारतीय शटलर्स या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही राष्ट्रकुल चॅम्पियन जोडी थायलंड ओपन सुपर 300 बॅडमिंटन (Badminton) स्पर्धेला मुकणार आहे, कारण सात्विक हिपच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा होऊ शकला नाही.
या महिन्याच्या सुरुवातीला इंडिया ओपन सुपर 750 स्पर्धेदरम्यान सात्विकला दुखापत झाली होती. त्यानंतर नवी दिल्लीतील स्पर्धेतून मध्यंतरी त्याला माघार घ्यावी लागली होती.
तसेच, जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकाच्या जोडीचा भाग असलेल्या चिरागने पीटीआयला सांगितले की, "दुखापतीतून अद्याप सावरलेलो नाही, त्यामुळे थायलंडमध्ये खेळणार नाही."
या 2 लाख 10 हजार डॉलरच्या बक्षीस स्पर्धेतून माजी जागतिक क्रमवारीत अव्वल भारतीय खेळाडू सायना नेहवाल आणि मालविका बनसोड यांनीही माघार घेतली आहे. सायनाचा सामना डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डशी होणार होता जिला तिने इंडिया ओपनमध्ये पराभूत केले होते.
तर, मालविकाचा सामना अव्वल मानांकित आणि माजी विश्वविजेत्या रत्चानोच इंतानोनशी होणार होता. महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व आता फक्त अनुपमा उपाध्याय आणि अश्मिता चालिहा करतील, ज्या पहिल्या फेरीत एकमेकांसमोर असतील.
कृष्ण प्रसाद गर्गा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला ही जागतिक क्रमवारीत 34व्या क्रमांकाची जोडी पुरुष दुहेरीत भारतीय आव्हानाचे नेतृत्व करेल.
दुसरीकडे, ईशान भटनागर आणि साई प्रतीक के यांची पहिल्या फेरीत झेप बे आणि आठव्या मानांकित लस्से मोल्हेडे यांच्याशी लढत होईल. पुरुष एकेरीत भारतीय आव्हान बी साई प्रणीतकडे असेल.
माजी सिंगापूर ओपन चॅम्पियन प्रणीत, जो जागतिक क्रमवारीत 51 व्या स्थानी घसरला आहे, त्याला पहिल्या फेरीत दुसऱ्या चीनच्या लिऊ गुआंग झूशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे.
त्याचबरोबर, दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या समीर वर्माची पहिल्या फेरीत सहाव्या मानांकित चीनच्या ली शी फेंगशी लढत होईल.
गेल्या आठवड्यात इंडोनेशिया मास्टर्सच्या मुख्य ड्रॉमध्ये पोहोचलेल्या प्रियांशू राजावतची लढत कोरियाच्या हिओ क्वांग हीशी होईल, तर ओडिशा ओपन चॅम्पियन किरण जॉर्जची लढत चायनीज तैपेईच्या चिया हाओ लीशी होईल.
मिथुन मंजुनाथची लढत पाचव्या मानांकित जपानच्या केंटा निशिमोटोशी होईल. त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदकविजेत्या जोडीचा सामना जपानच्या रेना मियाउरा आणि अयाको साकुरामोटो यांच्याशी होईल, तर श्रुती मिश्रा आणि एन सिक्की रेड्डी यांचा सामना अव्वल मानांकित जोंगकोल्फान कितिथाराकुल आणि थायलंडच्या (Thailand) रविंदा प्रजोंगजे यांच्याशी होईल.
तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा यांचा सामना चीनच्या टॅन निंग आणि झिया यू टिंग या जोडीशी होईल. मिश्र दुहेरीत बी सुमित रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा, रोहन कपूर आणि सिक्की आणि ईशान भटनागर आणि तनिषा कोर्टात उतरतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.