Team India
Team IndiaDainik Gomantak

Asia Cup 2023: भारतीय संघाची मोठी कसोटी! सलग तीन दिवस उतरणार मैदानात, नक्की गणित काय?

Team India: आशिया चषक 2023 स्पर्धेत भारतीय संघ सलग तीन दिवस क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

Team India will play consecutive three days in Asia Cup Super Four round:

आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (10 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सुपर फोरचा सामना होणार होता. पण कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना सुरु असतानाच पावसाने हजेरी लावली, त्यामुळे आता उर्वरित सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी (11 सप्टेंबर) होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला मात्र मोठ्या कसोटीला सामोरे जावे लागणार आहे.

रविवारी भारताविरुद्ध पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पण भारतीय संघ फलंदाजी करत असताना पाऊस आल्याने सामना थांबला. आता हा उर्वरित सामना सोमवारी पुढे खेळवला जाईल.

सामना थांबला तेव्हा भारताने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या आहेत. भारताकडून केएल राहुल 17 धावांवर आणि विराट कोहली ८ धावांवर नाबाद आहेत.

Team India
IND vs PAK: रोहित-गिलची शतकी भागदारी ठरली विक्रमी! भारताची ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

तथापि, पाकिस्तानविरुद्धचा सामना राखीव दिवशी पूर्ण होणार असल्याने भारतीय संघाला सलग तीन दिवस मैदानावर उतरून खेळण्याच्या कसोटीला समोरे जावे लागणार आहे. कारण वेळापत्रकाप्रमाणे भारतीय संघाला आशिया चषकातील सुपर फोर फेरीतील दुसरा सामना मंगळवारी (12 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्येच खेळायचा आहे.

त्यामुळे रविवारी भारतीय संघाचे पहिले चार फलंदाज मैदानात उतरले होते, तर सोमवारीही पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताला पूर्ण करायचा आहे. यानंतर लगेचच मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध पूर्ण वनडे सामना खेळायचा आहे. ही कसोटी आता भारतीय संघाला द्यावी लागणार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्यात आले, त्यावेळी केवळ अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता.

मात्र, सुपर फोर फेरी चालू झाल्यानंतर कोलंबोमधील पावसाचा अंदाज लक्षात घेता अचानक भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच निर्णयामुळे आता भारताला तीन दिवस मैदानात उतरावे लागणार आहे.

Team India
IND vs PAK हाय व्होल्टेज सामन्याचा राखीव दिवशी लागणार निकाल, वाचा नक्की काय झालं

महत्त्वाची गोष्ट अशी की सलग तीन दिवस खेळताना भारतीय संघव्यवस्थापनाला याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे की पावसामुळे सातत्याने येत असल्या व्यत्ययानंतर आणि सलग तीन दिवस खेळाडूंना मैदानात उतरावे लागत असल्याने खेळाडूंची मानसिकता चांगली राहिल, तसेच कोणालाही दुखापत होणार नाही.

कारण भारतीय संघाला आगामी काळात वनडे वर्ल्डकप ही महत्त्वाची स्पर्धा खेळायची आहे. त्यातच जसप्रीत बुमराह, केएल राहुल, श्रेयस अय्यर असे खेळाडू मोठ्या दुखापतींनंतर पुनरागमन करत आहेत, अशात खेळाडूंच्या वर्कलोडकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

तसेच सध्या भारतीय संघाला श्रेयस अय्यरच्या दुखापतीचीही चिंता असेल, तो पाठीत वेदना होत असल्याने पाकिस्तानविरुद्ध खेळलेला नाही. पण भारताला अपेक्षा असेल, की त्याची दुखापत गंभीर नसावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com