Team India Schedule:
बुधवारी भारतीय क्रिकेट संघाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बुधवारी 2024 वर्षातील पुरुष संघाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यांचाही समावेश आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जाहीर केल्यानुसार जुलै 2024 महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी20 सामने खेळायचे आहेत. हा दौरा टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा संपल्यानंतर लगेचच होणार आहे.
जून आणि जुलै 2024 दरम्यान टी20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. हा वर्ल्डकप कॅरेबियन बेटांवर (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाईल.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जाहीर केल्यानुसार 2024 चा हंगाम श्रीलंका जानेवारीमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेने सुरू करेल. झिम्बाब्वेविरुद्ध श्रीलंकेला 3 वनडे आणि 3 टी20 सामने मायदेशात खेळायचे आहेत.
त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धही तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिका श्रीलंकेला खेळायच्या आहेत. तसेच नंतर बांगलादेश दौऱ्यावरही तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिका होणार आहेत. त्यानंतर टी20 वर्ल्डकप होईल, तर भारताविरुद्धच्या मालिकांनंतर श्रीलंका इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका अशा देशांविरुद्धही सामने खेळणार आहे.
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ डिसेंबर-जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणार आहे, तर यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध जानेवारी 2024 मध्ये 3 टी20 सामने खेळणार आहे.
यानंतर जानेवारी 2024 च्या अखेरीस इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड भारताविरुद्ध मार्चपर्यंत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच त्यानंतर आयपीएल 2024 स्पर्धा होईल, त्यानंतर टी20 वर्ल्डकप 2024 भारताला खेळायचा आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.