Rohit Sharma: 'पराभव पचवणे सोपे नव्हते, पण...', वर्ल्डकप फायनलच्या 20 दिवसांनी अखेर रोहितकडून भावना व्यक्त

Video: वर्ल्डकप 2023 फायनलमधील पराभवानंतरच्या भावनांबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा व्यक्त झाला आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaBCCI

Team India captain Rohit Sharma opened up on loss at ICC ODI Cricket World Cup 2023 final against Australia:

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवण्यात आली होती. 19 नोव्हेंबर 2023 रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. अहमदाबादला झालेल्या या सामन्यात भारताला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

विशेष म्हणजे भारताने अंतिम सामन्यापूर्वी सलग 10 सामने जिंकले होते. अंतिम सामन्यापूर्वी या स्पर्धेत भारतीय संघ अपराजीत होता. मात्र, अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला आणि तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. यानंतर रोहितसह भारतीय खेळाडू प्रचंड निराश झालेले दिसले. जवळपास सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरळले होते.

रोहितचाही भावूक झालेला फोटो खूप व्हायरल झाला होता. दरम्यान, या अंतिम सामन्यानंतर आता तब्बल 20 दिवसांनी रोहितकडून या सामन्याबद्दलच्या भावना समोर आल्या आहेत.

इंस्टाग्रामवर @Team45ro या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्याबद्दल आणि या स्पर्धेबद्दल, तसेच त्यानंतरच्या भावनांबद्दल बोलताना दिसत आहे.

Rohit Sharma
'मृत्युशय्येवर असेल, तरी विराटची विकेट...', कमिन्सची World Cup फायनलबाबत पुन्हा एकदा मोठी प्रतिक्रिया

रोहितने वर्ल्डकप पराभवानंतरच्या दिवसांबद्दल सांगितले की 'सुरुवातीला मला काहीच कळत नव्हते, काय करायचे आहे. पण माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी माझ्या आजूबाजूचे वातावरण हलकेफुलके ठेवले होते. ज्याची मला मदत झाली.'

'हा पराभव पचवणे सोपे नव्हते, पण आयुष्य पुढे जात असते. खंरच सांगायचं झालं, तर ते खूप अवघड होते, पुढे जाणे सोपे नव्हते. मी 50 षटकांचा वर्ल्डकपपाहूनच मोठा झालो. माझ्यासाठी तो सर्वोत्तम पुरस्कार होता. आम्ही यासाठी गेली अनेक वर्षे काम करत होतो. त्यामुळे हे निराशाजनक होते, नाही का?'

'तुम्ही अनेक वर्षांपासून ज्याची वाट पाहात आहात आणि ज्याचे स्वप्न पाहात आहात, ते तुम्हाला न मिळाल्यावर वाईट वाटतेच. बऱ्याचदा तुम्ही वैतागता. आम्हाला जे शक्य होते, ते सर्व आम्ही केले.'

'जर तुम्ही मला विचाराल की काय चुकले, तर आम्ही 10 सामने जिंकले होते, पण त्या सामन्यातही चूका झाल्या होत्या. मात्र, त्या चूका प्रत्येक सामन्यात झाल्या. कोणताच सामना परिपूर्ण असू शकत नाही.'

Rohit Sharma
World Cup 2023: 'ऑस्ट्रेलियाने फसवलं...', कमिन्सने पहिली बॉलिंग घेण्यामागच्या कारणाचा अश्विनकडून खुलासा

रोहितने संघाच्या कामगिरीबद्दल अभिमान वाटत असल्याचेही सांगितले. तो म्हणाला, 'मी जेव्हा या सगळ्याची दुसर बाजू पाहातो, तेव्हा मला वाटते मला संघाचा अभिमान आहे, कारण आम्ही ज्याप्रकारे खेळलो, ते खूप शानदार होते. तुम्ही अशी कामगिरी प्रत्येक वर्ल्डकपमध्ये करू शकत नाही.'

'मला खात्री आहे की अंतिम सामन्यापर्यंत आम्ही ज्याप्रकारे खेळलो, त्याने लोकांना खूप आनंद दिला, अभिमानाचे क्षण दिले. पण त्या अंतिम सामन्यानंतर परत येणे कठीण होते. त्याचमुळे मी निर्णय घेतला की कुठेतरी जावे आणि यातून माझे मन काहीदिवस दुसरीकडे वळवावे.'

'पण नंतर जिथेही मी गेलो, लोक माझ्याजवळ येऊन प्रत्येकाने केलेल्या प्रयत्नांचे आणि आम्ही ज्याप्रकारे खेळलो, त्याचे कौतुकच करत होते. मी त्यांच्या भावना समजू शकत होतो. ते सर्व आमच्या बरोबर होते. त्यांनीही आमच्याबरोबर वर्ल्डकप उंचावण्याची स्वप्न पाहिली होती.'

Rohit Sharma
Rohit Sharma: ...अन् धोनीची भविष्यवाणी रोहितने काही मिनिटाच खरी करत ठोकल्या तब्बल 264 धावा

चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दलही रोहितने कृतज्ञता व्यत्त केली. रोहित म्हणाला, 'संपूर्ण वर्ल्डकप मोहिमेदरम्यान जे स्टेडियममध्ये आले होते आणि जे घरून पाहात होतो, त्या सर्वांकडून खूप पाठिंबा मिळत होता. आमच्यासाठी जे लोकांनी त्या दीड महिन्यात केले, त्याबद्दल मी कौतुक करतो. पण परत जेवढा जास्त मी त्याबद्दल विचार करतो, तेवढे जास्त वाईट वाटते की आम्ही जिंकू शकलो नाही.'

'लोक माझ्याकडे येत होते आणि सांगत होते की त्यांना संघाचा अभिमान वाटत आहे, त्यामुळे छान वाटत होते. त्यांच्याबरोबर मीही त्यातून बाहेर पडत होतो. मला वाटले की याच गोष्टी आहेत, ज्या ऐकणे महत्त्वाचे होते.'

चाहत्यांनी राग व्यक्त करण्यापेक्षा प्रेम दिल्याबद्दलही रोहितने आनंद व्यक्त केला. तसेच त्यामुळे प्रेरणा मिळाल्याचेही सांगितले.

तो म्हणाला, 'लोक जेव्हा समजतात की खेळाडूही कोणत्या गोष्टीतून जात आहे आणि वैतागून राग काढण्यापेक्षा अशा चांगल्या गोष्टी करतात, तेव्हा ते आमच्यासाठीही खूप मोलाचे असते.'

'माझ्यासाठी खरंच हे खूप महत्त्वाचे होते, कारण कुठेही तिथे राग नव्हता, तर मी ज्यांना भेटलो, त्या लोकांकडून फक्त प्रेमच मिळाले आणि हे खूप छान होते. त्यामुळे तुम्हाला परत येण्याची आणि पुन्हा काम करण्याची आणि पुन्हा नवीन शिखर गाठण्याची प्रेरणा मिळते.'

रोहित आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा दिसणार आहे. याच मालिकेतून तो पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com