...अन् विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ भरकटला

भारतीय क्रिकेट संघाकडून सध्या सुरू असलेल्या टी-20विश्वकरंडक स्पर्धेत खूप अपेक्षा होत्या, परंतु पहिल्या दोन सामन्यांनंतर अपेक्षाभंग झाला.
T-20 World Cup: Team India needs competent mindset
T-20 World Cup: Team India needs competent mindset Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाकडून सध्या सुरू असलेल्या टी-20विश्वकरंडक स्पर्धेत खूप अपेक्षा होत्या, परंतु पहिल्या दोन सामन्यांनंतर अपेक्षाभंग झाला. क्रिकेटमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध धुव्वा उडाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धही विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ भरकटला. दोन बलाढ्य संघाविरुद्ध नामुष्कीजनक हार पत्करल्यानंतर टीम इंडिया स्पर्धेतून गारद झाल्यातच जमा आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी माजी विजेत्यांना `जर-तर`वर अवलंबून राहावे लागेल. अफगाणिस्तानलाही कमी लेखता येणार नाही. हा संघ नवोदित असला, तरी धोकादायक आहे. साखळी फेरीतील आगामी लढतीत अफगाणिस्तानने भारतास हरविल्यास सारे क्रिकेट जगत ढवळून निघेल. भारतीय संघाची सध्याची मानसिकता पाहता, अफगाणिस्तान संघ मैदानावर सनसनाटी माजवू शकतो.

पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना केल्यानंतर देशभरातून चीड आणि संताप व्यक्त होत आहे. केवळ क्रिकेट चाहतेच नव्हे, तर माजी दिग्गज क्रिकेटपटूही नाराज आहेत. टी-20 विश्वकरंडकातील भारताच्या पराभवास कारणे अनेक आहेत. सद्यःस्थितीत संघ मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. सततच्या बायो-बबलमुळे दिशाहीन आणि खंगलेला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर जसप्रीत बुमराने भावनांना वाट मोकळी करून दिली. बायो-बबलच्या प्रतिकूल परिणामांची जाणीव करून दिली. विराट कोहली म्हणाला, `टी-20 क्रिकेटमध्ये आशावादी राहणे, सकारात्मकता आवश्यक आहे. जोखीम पत्करावी लागते.` याचाच अर्थ असा होतो, की कर्णधारास अपयश मान्य आहे. विराटला त्याची जाणीव स्पर्धेपूर्वी कशी झाली नाही हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

T-20 World Cup: Team India needs competent mindset
World Cup 2021: राहुल गांधी विराट कोहलीच्या पाठीशी

टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर विराट कोहली या प्रकारच्या क्रिकेटमधून संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होईल. प्रशिक्षक रवी शास्त्री यांचीसुद्धा ही अखेरची स्पर्धा आहे. साहजिकच विराट व शास्त्री भावनिक आहेत. त्यामुळेच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मेंटॉर या नात्याने बीसीसीआयला नियुक्त करावे लागले. विराटने स्पर्धेपूर्वी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून चूक तर केली नाही ना हा प्रश्न आता विचारला जात आहे. भारताचे माजी कसोटीपटू गौतम गंभीर यांच्यानुसार, टीम इंडियात मानसिक सामर्थ्याचा अभाव आहे. पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्ध मैदानावरील भारतीय खेळाडूंची देहबोली, खेळताना उडालेला गोंधळ या पार्श्वभूमीवर गौतम यांनी संघाचे दुखणे अचूक हेरले आहे.

संघ निवडीच्या बाबतीत बऱ्याच चुका झाल्या. आयपीएलमध्ये चमकलेले हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, आवेख खान आदी गोलंदाज संघात नाहीत, उलट कारकिर्दीच्या उतरतीवर असलेला भुवनेश्वर कुमार, तसेच महंमद शमी यांना आयपीएलप्रमाणेच विश्वकरंडकातही दिशा आणि टप्पा गवसला नाही. संयुक्त अरब अमिरातीतील आयपीएल टप्प्यात ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, व्यंकटेश अय्यर फलंदाजीत आश्वासक ठरले, पण त्यांना संघात स्थान नाही. फिरकी गोलंदाजीत रविचंद्रन अश्विनसारखा अनुभवी संघात असतानाही वरुण चक्रवर्तीस एकदम मोठ्या सामन्यात संधी देण्यात आली. पूर्ण तंदुरुस्त नसलेल्या हार्दिक पंड्याचे खूपच लाड का होताहेत हे आकलनापलीकडचे आहे. हार्दिक काही कपिलदेव नाही. टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानची फलंदाजी सखोल आहे, भारतीय संघात विराटच्या क्रमानंतर शेपूट सुरू होते. एकंदरीत टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ बांधणीच्या दृष्टीने भारताचा गृहपाठ झाला नाही हे स्पष्टच आहे. अतिक्रिकेट किंवा आयपीएल स्पर्धेला दोष देऊन चालणार नाही.

T-20 World Cup: Team India needs competent mindset
साळगावकर संघ धेंपो क्लबवर भारी

भारताला दोन्ही पराभव प्रथम फलंदाजी करताना पत्करावे लागले. विराटला नाणेफेक जिंकण्यात अपयश येत आहे. डावाच्या उत्तरार्धात गोलंदाजी टाकताना अमिरातीत रात्री उशिरा पडणाऱ्या दवाचा त्रास होत असल्याचे कारण दिले जाते. इंग्लंडने दुसऱ्या डावात गोलंदाजी करत श्रीलंकेला हरविले, त्यावेळी त्यांच्या गोलंदाजांनाही दवाचा त्रास सहन करावा लागला, पण सामना हातून निसटू दिला नाही. अनुकूल-प्रतिकूल या बाबी क्रिकेटमध्ये आहेतच, त्यांच्याशी तडजोड करत, जुळवून घेत सामने जिंकणे अत्यावश्यक आहे. भारतीय संघ सत्य स्वीकारायला तयारच नाही, त्यांची मानसिकताच पुरती कोलमडली आहे. आपला संघ तेवढा शूर नाही असे खुद्द कर्णधार विराटलाच वाटते. कर्णधाराच आपल्या संघाच्या क्षमतेविषयी साशंक आहे. दोन बड्या संघांविरुद्ध नांगी ठेचली गेली, अफगाणिस्तानचा मोठा धोका आहे. नामिबिया, स्कॉटलंड आदी नवख्या संघांविरुद्ध जिंकणे केवळ आकडेवारीच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल. तांत्रिकदृष्ट्या भारतीय संघ अजून विश्वकरंडक स्पर्धेतून बाद झालेला नाही, तरीही पुढील विश्वकरंडक स्पर्धेची तयारी आतापासूनच करावी लागेल. त्यासाठी कणखर कर्णधार आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com