SA20: साऊथ आफ्रिका टी20 लीग स्पर्धेचा पहिला विजेता संघ मिळाला आहे. रविवारी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केप संघाने प्रिटोरिया कॅपिटल्सला 4 विकेट्सने पराभूत केले आणि विजेतेपद नावावर केले आहे. त्यामुळे एडेन मार्करम ही स्पर्धा जिंकणारा पहिला कर्णधारही ठरला.
या सामन्यात कॅपिटल्सने सनरायझर्ससमोर 136 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग सनरायझर्सने 6 विकेट्स गमावत 16.2 षटकातच 137 धावा करत पूर्ण केला आणि विजेतेपदावर हक्क सांगितला.
सनरायझर्सकडून सलामीवीर ऍडम रॉसिंग्टनने सर्वाधिक 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच कर्णधार एडेन मार्करम (26) आणि जॉर्डन हरमन (22) यांनीही छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्यामुळे सनरायझर्सला विजय मिळवणे सोपे झाले.
कॅपिटल्सकडून एन्रीच नॉर्कियाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच एथन बोश, आदील राशिद, कोलिन इंग्राम आणि जीमी निशाम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी अंतिम सामन्यात सनरायझर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कॅपिटल्स संघाला फलंदाजीला उतरावे लागले. पण सनरायझर्सच्या गोलंदाजांनी नाणेफेकीवेळी घेतलेला निर्णय योग्य ठरवत कॅपिटल्सला 135 धावांवर रोखले.
कॅपिटल्सकडून कुशल मेंडिसने सर्वाधिक 21 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त या संघाकडून एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्याच्यापाठोपाठ रिली रुसोव आणि जीमी निशाम यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या.
सनरायझर्सकडून 18 व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर रोलोफ व्हॅन डर मर्वेने दोन विकेट्स घेतल्या, तर 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिसांडा मंगलाने कॅपिटल्सचा कर्णधार वेन पार्नेलला बाद केले होते. त्यामुळे सलग तीन विकेट्स गेल्याने कॅपिटल्सला मोठा धक्का बसला. अखेर 19.3 षटकात कॅपिटल्स 135 धावांवर सर्वबाद झाले.
सनरायझर्सकडून रोलोफ व्हॅन डर मर्वेने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच ओटनील बार्टमन आणि सिसांडा मंगलाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मार्को यान्सिन आणि एडेन मार्करमने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
मर्वेने त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे सामनावीराचा पुरस्कारही जिंकला. तसेच मार्करम स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने 11 सामन्यांत 340 धावा केल्या. तसेच 11 विकेट्सही घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.