New Zealand Cricket Support Staff:
भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. वर्ल्डकपच्या मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्याआधी 29 सप्टेंबरपासून सराव सामने खेळले जातील. त्यामुळे आता या स्पर्धेसाठी दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी राहिल्याने सहभागी संघांनी तयारीला सुरुवात केली आहे.
गेल्या दोन वनडे वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवलेल्या न्यूझीलंडचीही जोरदार तयारी सुरू असून चार दिग्गज माजी खेळाडूंना संघाच्या सपोर्ट स्टाफशी जोडण्यात आले आहे.
न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बेल आणि जेम्स फोस्टर आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सक्लेन मुश्ताक हे चार दिग्गज खेळाडू न्यूझीलंडबरोबर पुढील चार महिन्यात वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करण्यार आहेत.
स्टीफन फ्लेमिंग यांना प्रशिक्षण क्षेत्राचा चांगला अनुभव आहे. त्यांनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे 2009 पासून प्रशिक्षकपद भुषवले आहे. तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चेन्नईने 5 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.
याशिवाय 2021 टी20 वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात पोहचलेल्या न्यूझीलंड संघाबरोबरही त्यांनी काम केले होते. ते आता पुढील महिन्यात द हंड्रेडमधील साउदर्न ब्रेवमेनबरोबरील आपली जबाबदारी संपल्यानंतर आगामी 8 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत न्यूझीलंड संघाशी जोडले जातील.
न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी म्हटले आहे की फ्लेमिंग यांचे मार्गदर्शन न्यूझीलंडसाठी महत्त्वाचे ठरू शकते, कारण त्यांना भारतातील क्रिकेटचा अनुभव आहे.
याशिवाय फोस्टर देखील इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाशी जोडला जाईल. तो भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपदरम्यानही न्यूझीलंड संघाबरोबर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून असेल. तो सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सहाय्यक प्रशिक्षक आहे. त्याने अनेक टी20 लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
त्याचबरोबर इयान बेल इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत सहाय्यक प्रशिक्षक असेल, तर वनडे मालिकेत ल्युक राँचीच्या जागेवर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिल.
राँची वर्ल्डकप 2023 पूर्वी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी पुन्हा न्यूझीलंड संघाशी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडला जाईल. दरम्यान, या मालिकेवेळी न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक स्टेड विश्रांतीवर असतील. त्यामुळे बेल न्यूझीलंड संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिल.
तसेच वर्ल्डकप 2023 नंतर न्यूझीलंड लगेचच बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. यावेळीही स्टेड विश्रांतीवर असतील. त्यावेळी सक्लेन सहाय्यक प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंड संघात जबाबदारी सांभाळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.