5 Takeaways from India tour of Ireland:
भारतीय क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा नुकताच संपला आहे. या दौऱ्यात भारत आणि आयर्लंड संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात आली. पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला, पण 23 ऑगस्टला होणारा तिसरा टी20 सामना पावसामुळे रद्द झाला.
त्यामुळे ही मालिका भारताने 2-0 अशा फरकाने जिंकली. दरम्यान, ही मालिका वेगवेगळ्या कारणांनी भारतीय संघासाठी खास राहिली. या दौऱ्यात घडलेल्या 5 महत्त्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकू
बुमराहच्या दुखापतग्रस्त पाठीवर काही महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्याला अनेक मोठ्या स्पर्धांना गेल्या 10 महिन्यात मुकावे लागले आहे. पण आता तो या दुखापतीतून पूर्ण सावरला असल्याचे त्याने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करत दाखवून दिले आहे.
त्याने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच डावात 2 विकेट्स घेत, तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्यास सज्ज असल्याचा इशारा दिला. त्याने या मालिकेत २ सामन्यात 4 विकेट्स घेतल्या.
प्रसिद्ध कृष्णाने 2021 मध्ये भारतीय संघाकडून वनडेत पदार्पण केले होते. त्याने 14 वनडे सामने खेळताना 25 विकेट्सही घेतल्या. मात्र, तो देखील गेल्या काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त होता.
बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तो रिहॅबिलिटेशन करत होता. पण आता तोही दुखापतीतून पूर्ण सावरला असून त्यानेही आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
विशेष म्हणजे या मालिकेतून प्रसिद्धचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पणही झाले. त्याने या मालिकेत त्याने 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला आगामी आशिया चषक स्पर्धेसाठीही भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
भारताचा 22 वर्षीय फिरकीपटू रवी बिश्नोईनेही या मालिकेत त्याची छाप पाडली आहे. त्यानेही बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्याबरोबरीने 2 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या.
त्याची फिरकी गोलंदाजी या मालिकेत भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरली. विशेष म्हणजे आगामी एशियन गेम्समध्ये तो भारतीय संघाचा भाग असणार आहे. याचदृष्टीने त्याची ही कामगिरी महत्त्वाची ठरली आहे.
आयपीएल 2023 स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर रिंकू सिंगला आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी मिळाली. त्याला या दौऱ्यातून पदार्पण करण्याचीही संधी देण्यात आली. पण त्याला पहिल्या टी20 सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
मात्र, दुसऱ्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याने 21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 38 धावा केल्या. ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलीच खेळी ठरली. त्याला या खेळीसाठी सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. आता रिंकू एशियन गेम्समध्येही खेळताना दिसणार आहे.
बुमराहने आयर्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तो भारताचे टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारा 11 वा खेळाडू ठरला होता. दरम्यान, त्याने या मालिकेत निराश न करता कर्णधारपदाची जबाबदारी उत्तमप्रकारे सांभाळली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.