Sri Lanka vs New Zealand, 11 Overs in ODI Cricket: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा अनपेक्षित गोष्टी घडताना दिसतात. अशीच एक घटना शुक्रवारी झालेल्या श्रीलंका महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघातील दुसऱ्या वनडे सामन्यात घडली. या सामन्यात न्यूझीलंडची फिरकीपटू एडन कार्सनने 11 षटके गोलंदाजी केली.
सध्या न्यूझीलंडचा महिला संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दुसरा सामना गॉलला शुक्रवारी झाला, ज्यात न्यूझीलंडने 8 चेंडू राखून आणि 111 धावांनी विजय मिळवला. पण याच सामन्यात कार्सनने ११ षटके टाकण्याची अनपेक्षित गोष्टही पाहायला मिळाली.
महत्त्वाचे म्हणजे सामना सुरु असताना तिच्या किंवा दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या किंवा पंचाच्याही लक्षात आले नाही की ती 11 व्या षटकात गोलंदाजी करत आहे.
कार्सनने श्रीलंकेचा संघ फलंदाजी करत असताना 45 व्या षटकापर्यंत तिचे 10 षटके पूर्ण केली होती. तिने पहिल्या 10 षटकात 2 विकेट्सही घेतल्या होत्या. यात श्रीलंकेची सलामीला फलंदाजीला आलेल्या हर्षिका समरविक्रमाच्या विकेटचाही समावेश होता.
पण तिने नंतर 47 व्या षटकातही गोलंदाजी केली. हे तिचे सामन्यातील 11 वे षटक ठरले. या षटकात 5 चेंडू निर्धाव ठरले तर एका चेंडूवर एक धाव निघाली. त्यामुळे तिची या सामन्यातील आकडेवारी 11 षटकेत 41 धावा आणि 2 विकेट्स अशी होती.
दरम्यान तिचे हे षटक सामन्याला फार कलाटणी देणारे ठरले नाही कारण ती जेव्हा 11 वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आली तेव्हा अखेरच्या चार षटकात श्रीलंकेला विजयासाठी 119 धावांची गरज होती, तर न्यूझीलंडला 1 विकेटची गरज होती.
तथापि, आयसीसीच्या 13.9.1 नियमानुसार कोणताही गोलंदाज 10 किंवा त्यापेक्षा अधिक षटके गोलंदाजी करू शकत नाही.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 21 वर्षीय कार्सन 1993 नंतर वनडेमध्ये 10 पेक्षा अधिक षटके गोलंदाजी करणारी पहिली न्यूझीलंडची गोलंदाज ठरली आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने 50 षटकात 7 बाद 329 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून एमिलिया केरने 108 धावांची आणि कर्णधार सोफी डिवाईनने 137 धावांची शतकी खेळी केली. श्रीलंकेकडून ओशाडी रणसिंघेने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 330 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला श्रीलंकेचा संघ 48.4 षटकात 218 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून कविशा दिल्हारीने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही. न्यूझीलंडकडून ली ताहुहूने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेच्या या पराभवामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असून अखेरचा सामना गॉलमध्ये ३ जुलैला पार पडणार आहे. पहिला वनडे सामना श्रीलंकने डकवर्थ लुईस नियमानुसार 9 विकेट्सने जिंकला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.