Sourav Ganguly statement on India Team: भारतीय क्रिकेट संघाला आगामी काळात वर्ल्डकप आणि आशिया चषक स्पर्धा खेळायची आहे. दरम्यान, या राहुल द्रविडच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून २ वर्षांच्या करारातील अखेरच्या मोठ्या स्पर्धा असणार आहेत.
आत्तापर्यंत द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मोठ्या स्पर्धांमध्ये फारसे यश मिळवलेले नाही. भारताला जूनमध्ये कसोटी चॅम्पियनशीप 2023 अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले, तसेच टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभव स्विकारावा लागला.
तसेच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका पराभव, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्याचमुळे आता आगामी स्पर्धांमध्ये द्रविडच्या मार्गदर्शनातील भारतीय संघाच्या कामगिरी लक्ष राहणार आहे.
दरम्यान द्रविड आणि भारतीय संघाबद्दल माजी कर्णधार सौरव गांगुलीने सोमवारी एका कार्यक्रमात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
तो म्हणाला, 'कमीतकमी ते अंतिम सामन्यापर्यंत पोहचत आहेत. प्रशिक्षक म्हणून द्रविडला आणि रोहित, कोहलीसारख्या खेळाडूंना माहित आहे, बाद फेरीपर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी जिंकायला हवे. प्रत्येकवेळी नाही, पण कमीत कमी त्यातील ५० टक्के वेळा तरी.'
द्रविडकडे जेव्हा मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हा गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होता. त्याने या पदासाठी द्रविडला मनवण्यात मोठा वाटा उचलला होता.
गांगुली पुढे म्हणाला, 'मला कोणतीही मत मांडायचे नाही. आपण वर्ल्डकपनंतर काय होते, ते पाहू. मी त्याला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा देतो. त्याच्याकडे असा संघ आहे, जो पुढे जाऊ शकतो. राहुलनेही भारतासाठी खेळाडू म्हणून वर्ल्डकपमध्ये कामगिरी बजावली आहे आणि त्याला माहित आहे, त्यासाठी काय करावे लागते. आशा आहे की ते चांगले खेळतील.'
'तुम्ही वर्ल्डकप पूर्वी आणि नंतर काय करता, त्याने फरक पडत नाही. त्या दिवशी तुम्ही किती चांगले खेळता, त्यानुसार वर्ल्डकप जिंकता येतो. मला आशा आहे तो हा संदेश सर्वांपर्यंत पोहचवेल.'
तसेच भारतीय संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीनंतर पुनरागमन करत आहेत. पण त्याबद्दल चिंता नसल्याचेही गांगुलीने सांगितले आहे. तो म्हणाला, 'ते आशिया चषकात आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामने खेळणार आहेत. तसेच भारताचे शिबिरही असेल. हे सर्व पुरेसे आहे.'
'भारताला फक्त चांगली फलंदाजी करण्याची गरज आहे. त्यांना मोठी धावसंख्या उभारावी लागेल. त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. फिरकी गोलंदाजीही स्पर्धा जसजशी पुढे जाईल, तशी महत्त्वाचा भाग बनत जाईल.'
याशिवाय द्रविडने चौथ्या क्रमांकवरील फलंदाजीबद्दल बोलताना सांगितले की त्यात लवचिकता पाहिजे. त्याचबरोबर गांगुलीने असेही म्हटले की रोहितसाठी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटचे दरवाजे बंद झालेले नाही. तसेच रोहित, कोहली, शमी, सिराज, बुमराह यांसारखे खेळाडू कोणत्याही प्रकारासाठी योग्य आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.