Sourav Ganguly on Virat Kohli and Rohit Sharma Captaincy: भारतीय क्रिकेट संघाने नुकताच कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभव स्विकारला. त्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पण यानंतर आता सौरव गांगुलीने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्माबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
गांगुलीने म्हटले आहे की ज्यावेळी विराटने भारताच्या कसोटी संघाने नेतृत्व सोडले होते, त्यावेळी तो चकीत झाला होता. विराटने 2021 च्या टी20 वर्ल्डकपनंतर टी20 संघाचे नेतृत्व सोडले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याला वनडे कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. यानंतर त्याने 2022 च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान कसोटी संघाचेही नेतृत्व सोडले होते.
बीसीसीआयचा माजी अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार गांगुलीने आज तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की 'नाही, बोर्ड त्याने कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत तयार नव्हते. मला माहित नाही, त्याने असे का केले. फक्त तोच याबद्दल सांगू शकतो.
दरम्यान गांगुलीला जेव्हा विचारण्यात आले की जर विराट संघाचा कर्णधार असता, तर कसोटी चॅम्पियनशीप 2023 अंतिम सामन्यात भारतीय संघ चांगल्या स्थितीत असता का? कारण पहिल्या दिवसापासून भारतीय संघ बॅकफूटवर पडला होता.
याबद्दल बोलताना गांगुली म्हणाला, 'आत्ता हे बोलून काहीच अर्थ नाही. कारण कर्णधाराने त्याची नेतृत्वाची भूमिका स्वत:हून सोडली होती. आत्ता हे सर्व बोलण्याला काही अर्थ नाही. निवडकर्त्यांना (नव्या) कर्णधाराची नियुक्ती करणे गरजेचे होते.'
'त्यावेळी रोहित शर्मा उत्तम पर्याय होता. त्याने 5 आयपीएल स्पर्धा जिंकल्या आहेत. आशिया चषकाप्रमाणे जेव्हाही त्याला कर्णधारपदाची संधी मिळाली, तेव्हा त्याने स्पर्धा जिंकली. तो उत्तम पर्याय होता. त्याने आत्ता कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातही संघाचे नेतृत्व केले, जरी आपण पराभूत झाललो असलो तरी.'
'आपण वर्ल्डकपच्या (2022 टी20 वर्ल्डकप) उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलो. त्याआधी (2021 टी20 वर्ल्डकप) आपण बाद फेरीसाठीही पात्र ठरलो नव्हतो. माझा रोहितवर विश्वास आहे. फक्त तो आणि एमएस धोनी यांनी 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे, बाकी कोणीही नाही.'
याशिवाय गांगुलीने अशीही प्रतिक्रिया दिली की आयपीएल जिंकणे हे वर्ल्डकप जिंकण्यापेक्षाही कठीण आहे. भारताला आगामी काळात भारतातच वनडे वर्ल्डकप खेळायचा आहे. ही वर्ल्डकप स्पर्धा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
गांगुली म्हणाला, 'आयपीएल जिंकणे सोपे नाही. ही खूप कठीण स्पर्धा आहे. आयपीएल जिंकणे वर्ल्डकपपेक्षाही कठीण आहे. 14 सामन्यांनंतर तुम्ही प्लेऑफमध्ये पोहचता. जेव्हा तुम्ही तेव्हाच चॅम्पियन बनता जेव्हा 17 व्या सामन्यात विजय मिळवता.'
'वर्ल्डकपमध्ये तुम्हाला उपांत्य सामन्यासाठी पात्र ठरण्यासाठी केवळ 4-5 सामने जिंकाव लागतात. मला विश्वास आहे की रोहित तेव्हाही सर्वोत्तम पर्याय होता आणि आत्ताही आहे.'
गांगुलीने रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघाला वनडे वर्ल्डकप विजेतेपदासाठी प्रबळ दावेदारही म्हटले आहे. तो म्हणाला, 'मला असे वाटते की रोहितने निडरपणे भारताचे नेतृत्व करावे, बाकी जे होईल, ते होईल.'
'आपल्याला सहा महिन्यांनंतर वर्ल्डकप खेळायचा आहे. या संघात रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह असे खेळाडू आहेत. पण बुमराह तोपर्यंत तंदुरुस्त होईल की नाही माहिती नाही. पण मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज तुम्हाला सामने जिंकवून देऊ शकतात.'
'माझ्या मते मी राहुल द्रविडबरोबर खेळो आहे आणि त्याच्याबद्दल खूप आदर आहे. तो फक्त रोहितबरोबर संघाला पुढे नेऊ शकतो. मी फक्त हाच सल्ला देईल की जा आणि बिंधास खेळा.'
भारतीय संघ वर्ल्डकपपूर्वी आशिया चषकही खेळणार आहे. तसेच या वनडे वर्ल्डकपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.