Sourav Ganguly Said he didn't remove Virat Kohli from captaincy:
भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद या विषयावर गेली अनेक वर्षांपासून चर्चा होत आहेत. त्यातच विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्यावरून देखील बऱ्याच चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील मतभेदही झाल्याचे म्हटले गेले. आता विराटच्या कर्णधारपदाबद्दल गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे.
विराटने २०२१ टी२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व सोडले होते. त्यानंतर त्याला काहीदिवसातच बीसीसीआय निवड समितीकडून वनडे कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले.
यानंतर लगेचच एक महिन्यात विराटने कसोटी संघाचेही नेतृत्वपद सोडले होते. या घटनांदरम्यान गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होता. त्यामुळे त्याने विराटला कर्णधारपदावरून हटवल्याच्याही चर्चा झाल्या होत्या.
याबद्दल बोलताना गांगुलीने सांगितले आहे की निवड समितीची इच्छा नव्हती की मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार असावेत, त्यामुळे त्याने विराटला टी२० संघाचे कर्णधारपद न सोडण्याबद्दल सांगितले होते.
गांगुलीने 'दादागिरी अनलिमिटेड सिजन १०' या रियालिटी शोमध्ये सांगितले की 'मी विराटला कर्णधारपदावरून हटवले नाही. मी यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. त्याला टी२० संघाचे नेतृत्व करण्यात रस नव्हता. त्यामुळे त्याने ते कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.'
'मी त्याला सांगितले होते की जर तुला टी२० क्रिकेटमध्ये नेतृत्व करायचे नसेल, तर तू संपूर्ण मर्यादीत षटकांच्याच क्रिकेटमधून नेतृत्व सोडणे योग्य असेल. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये एक आणि कसोटीत एक असे कर्णधार असणे योग्य आहे.'
गांगुलीने असेही सांगितले की विराटनंतर रोहित नेतृत्व करण्यास तयार नव्हता, पण त्याने त्याचे मन वळवले. विराट भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर तिन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये रोहितकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
गांगुली म्हणाला, 'मी रोहित शर्माला कर्णधारपद स्विकारण्यासाठी मनवले. कारण त्याला तिन्ही प्रकारात नेतृत्व करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे कदाचीत त्यात माझे योगदान होते. पण प्रशासनात कोण आहे, यापेक्षा मैदानात कोणता खेळाडू चांगली कामगिरी करतो, हे महत्त्वाचे आहे. मला भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. हा त्याचा छोटा भाग आहे.'
दरम्यान, रोहितने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 105 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. यामध्ये भारताने 78 सामन्यात विजय मिळवले आहेत, तर 24 सामन्यात पराभव स्विकारले आहेत. त्याचबरोबर 2 सामने अनिर्णीत राहिलेत, तर एक सामन्याचा निकाल लागलेला नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.