Shreyas Iyer: 'तुम्हाला काय म्हणायचंय?', शॉर्ट बॉलच्या प्रश्नावर अचानक भडकला श्रेयस अय्यर
Shreyas Iyer reacted on question on Short Ball after India vs Sri Lanka ICC ODI Cricket World Cup 2023:
गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारताच्या या विजयात श्रेयस अय्यरनेही महत्त्वाचे योगदान दिले. त्याने 56 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांसह 82 धावांची खेळी केली. दरम्यान, सामन्यानंतर श्रेयस पत्रकार परिषदेसाठीही उपस्थित होता. यावेळी त्याला विचारलेल्या आखुड टप्प्याच्या चेंडूच्या प्रश्नावर तो संतापल्याचे दिसले.
खंरतर श्रेयस गेल्या काही सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसले होते. तसेच तो बऱ्याचदा आखुड टप्प्याच्या चेंडूवर बाद झाल्याचे दिसले होते, त्यामुळे ही त्याची कमजोरी असल्याची चर्चा होत होती. तसेच असेही समोर आले होते की त्याने आखुड टप्प्याच्या चेंडूंचा अधिक सराव नेट्समध्ये केला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार याचबद्दल त्याला गुरुवारी सामन्यानंतर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता की त्याला आखुड टप्प्याच्या चेंडूची समस्या आहे का? त्यावर त्याने काहीसे वैतागत प्रतिप्रश्न केला की 'जर तुम्ही माझ्यासाठी समस्या आहे, असे म्हणत आहात, तर तुम्हाला काय म्हणायचे आहे?'
त्यानंतर पत्रकाराने त्याला सांगितले की 'अगदीच समस्या नाही, पण ते चेंडू तुला सतावत आहेत.' यावर अय्यरने वैतागून अशा गोष्टी मीडियाकडूनच तयार होत असल्याचे म्हटले.
तो म्हणाला, 'मला सतावत आहेत? तुम्ही मी खेळलेले पुल शॉट्स पाहिले का, विशेषत: जे चौकारासाठी गेले. तुम्ही जर मोठे फटके खेळत आहात, तर तुम्ही तसेही बाद होण्याची शक्यता आहेच, मग तो आखुड टप्प्याचा चेंडू असो किंवा ओव्हरपिच चेंडू असो.'
'मी जर दोन-तीनवेळा त्रिफळाचीत झालो, तर तुम्ही म्हणाल, तो इनस्विंग चेंडू खेळू शकत नाही, जर चेंडू सिम होत असले, तर कट शॉट खेळू शकत नाही.'
श्रेयस पुढे म्हणाला, 'खेळाडू म्हणून आम्ही कोणत्याही चांगल्या चेंडूवर बाद होऊ शकतो. तुम्ही लोकांनी बाहेर असे वातावरण तयार केले आहे की मी आखुड टप्प्याचे चेंडू खेळू शकत नाही. मला वाटते की लोकांनी तेच लक्षात ठेवले आहे आणि ते तुमच्याच डोक्यास सतत सुरू असते आणि तुम्ही त्यावरच काम करत राहाता.'
याबरोबरच श्रेयसने असेही म्हटले की त्याचे घरचे मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवर चांगली उसळी आहे, त्यामुळे त्याला आखुड टप्प्याच्या चेंडूंची सवय आहे.
तो म्हणाला, 'मी मुंबईचा आहे, वानखेडेवर बाकी कोणत्याही मैदानांपेक्षा अधिक उसळी असते. मी माझे सर्वाधिक क्रिकेट येथे खेळलो आहे, त्यामुळे मला त्याचा कसा सामना करायचा माहिती आहे.'
'हे असे आहे की कधी कधी तुम्ही मोठे फटके खेळता कधी बाद होता. कधीकधी तुम्हीसाठी गोष्टी साध्य होतात, कधी नाही होत आणि बऱ्याचदा माझ्यासाठी ते साध्य झाले नव्हते. कदाचीत त्याचमुळे तुम्हाला वाटले असेल की माझ्यासाठी ही समस्या आहे, पण मला माहित आहे ही माझ्यासाठी समस्या नाही.'
भारताचा विजय
दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यर व्यतिरिक्त विराट कोहली आणि शुभमन गिल या दोघांनीही अर्धशतके केली. विराटने 11 चौकारांसह 88 धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलने 92 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 92 धावांची खेळी केली.
त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशनकाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकात 55 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराजने 3 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.