37th National Sports Competition: गोव्यातच नेमबाजी स्पर्धा होणार असल्याचे 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकात शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याने आता देशभरातील नावाजलेले नेमबाज मांद्रे व पेडणे येथील यश शूटिंग अकादमी संकुलात एक नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर या कालावधीत सुवर्ण, रौप्य व ब्राँझपदकांसाठी झुंजतील.
स्पर्धा अधिकृत संकेतस्थळावर स्पर्धेतील ४३ खेळांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार चार खेळांच्या स्पर्धा २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटनापूर्वी खेळल्या जातील.
बॅडमिंटन स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत, नेटबॉल स्पर्धा कांपाल-पणजी येथे २२ ते २७ ऑक्टोबरला, जिम्नॅस्टिक्स पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात २३ ते २८ ऑक्टोबरला, तर बास्केटबॉल स्पर्धा २३ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये खेळली जाईल.
विविध खेळांचे सामने नऊ नोव्हेंबरपर्यंत कांपाल-पणजी, फातोर्डा-मडगाव, नावेली, पेडे-म्हापसा, फोंडा, चिखली-वास्को आणि मांद्रे-पेडणे येथे होतील. स्पर्धेतील सर्व खेळांत पात्र ठरलेल्या आठ संघांत चुरस राहील.
सर्वप्रथम ‘गोमन्तक’मध्ये वृत्त
३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी खेळ मांद्रे व पेडणे येथे होणार असून त्यादृष्टीने प्राधान्य देण्यात आल्याचे वृत्त ‘गोमन्तक’ने सर्वप्रथम २८ ऑगस्ट रोजी ढळकपणे दिले होते. त्यावर स्पर्धा आयोजन समितीने अधिकृत संकेतस्थळावर आता शिक्कामोर्तब केले.
यापूर्वी गोव्यात नेमबाजी साधनसुविधा नसल्याचे कारण देत ही स्पर्धा नवी दिल्ली येथील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर घेण्याचे ठरले होते.
मात्र मांद्रे व पेडणे येथे नेमबाजी सुविधात तयार करण्यासाठी यश शूटिंग अकादमीचे संचालक योगेश पाडलोसकर यांनी घेतलेली मेहनत अखेरीस निर्णायक ठरली.
‘‘राष्ट्रीय स्पर्धेनिमित्त गोव्यातच अद्यावत नेमबाजी साधनसुविधा तयार झाल्या आहेत. शॉटगन रेंजचे कामही पूर्ण होत आले आहे. यश शूटिंग अकादमीतर्फे तयार करण्यात आलेल्या नेमबाजी सुविधा कायमस्वरूपी असून भविष्यात गोमंतकीय नेमबाजांसाठी उपयोगी ठरतील. या ठिकाणी मोठ्या नेमबाजी स्पर्धाही घेता येतील. पूर्ण सहकार्य दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्य सरकार व संबंधित अधिकारी यांचाही आभारी आहे,’’ असे योगेश यांनी सोमवारी सांगितले.
नेटबॉलमधील संघ निश्चित
भारतीय नेटबॉल महासंघाने ३७व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र आठ संघांची यादी जाहीर केली आहे. ४०व्या राष्ट्रीय सीनियर नेटबॉल स्पर्धेतील मानांकनानुसार पहिले सात आणि यजमान गोवा असे एकूण आठ संघ पात्र ठरले आहेत.
पारंपरिक नेटबॉलमध्ये पुरुष गटात यजमान गोव्यासह हरियाना, दिल्ली, केरळ, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, तेलंगणा हे संघ, तर महिला गटात गोव्यासह हरियाना, दिल्ली, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात हे संघ खेळतील.
फास्ट ५ नेटबॉलमध्ये सीनियर स्पर्धेतील मानांकनानुसार पुरुष गटात हरियाना, केरळ, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब व यजमान गोवा, तर महिला गटात हरियाना, पंजाब, चंडीगड, केरळ, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, दिल्ली व यजमान गोवा या संघांचा समावेश आहे.
फक्त दोन खेळ गोव्याबाहेर
नेमबाजी गोव्यातच होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर आता फक्त दोन खेळ गोव्याबाहेर होतील. सायकलिंग (ट्रॅक रेस) नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियम संकुलात दोन ते पाच नोव्हेंबर या कालावधीत, तर गोल्फ स्पर्धा दिल्लीतच पाच ते नऊ नोव्हेंबर या कालावधीत होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.