India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मंगळवारी पहिला टी20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने केवळ 2 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीनेही महत्त्वाची कामगिरी बजावली.
मावीने याच सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने पदार्पणातच आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. त्याने या सामन्यात गोलंदाजी केलेल्या चारही षटकात प्रत्येकी एक विकेट घेतली. एकूण चार विकेट घेण्यासाठी त्याने 22 धावा खर्च केल्या.
त्यामुळे तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पणात सर्वोत्तम प्रदर्शन करणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर बरिंदर स्त्रान अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 2016 साली झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण करताना 10 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच प्रज्ञान ओझा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २००९ साली बांगलादेशविरुद्ध नॉटिंगघममध्ये आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण करताना २१ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या. आता स्त्रान आणि ओझानंतर मावीने या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.
(Best figures on T20I debut for India)
मावी हा भारताकडून टी20 पदार्पण करणारा 101 वा खेळाडू ठरला आहे. त्याच्याशिवाय मंगळवारी झालेल्या सामन्यात हर्षल पटेल आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 163 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला 20 षटकात सर्वबाद 160 धावाच करता आल्या. श्रीलंकेकडून कर्णधार दसून शनकाने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली.
तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 162 धावा केल्या होत्या. भारताकडून दीपक हुडाने सर्वाधिक नाबाद ४१ धावांची खेळी केली, त्याला अक्षर पटेलने नाबाद 31 धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी ६ व्या विकेटसाठी नाबाद 68 धावांची भागीदारी केली होती.
तसेच ईशान किशनने 37 धावांची खेळी केली, तर कर्णधार हार्दिक पंड्याने 29 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.