Sanju Samson return home after KL Rahul joined Team India for Asia Cup 2023 Super Four:
भारतीय संघ सध्या श्रीलंकेत असून आशिया चषक २०२३ स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धेतील सुपर फोरची फेरी सुरू झाली आहे. फेरीआधी भारतीय संघात दुखापतीतून सावरल्यानंतर केएल राहुलचे पुनरागमन झाले आहे.
दरम्यान, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार केएल राहुल संघात सामील झाल्यानंतर संजू सॅमसनला संघातून मुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे तो भारतात परतला आहे. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या १७ जणांच्या भारतीय संघात समावेश नव्हता.
मात्र, केएल राहुल साखळी फेरीसाठी पूर्ण फिट नसल्याने कव्हर म्हणून सॅमसन राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघासह श्रीलंकेला गेला होता. मात्र, सुपर फोर फेरीसाठी केएल राहुल परतला असल्याने आता सॅमसन पुन्हा घरी परतला आहे. केएल राहुल इशान किशनसह यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघात आहे.
केएल राहुल दुखापतीमुळे आशिया चषकाच्या साखळी फेरीत खेळला नव्हता. त्यावेळी तो बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होते. तेथील वैद्यकिय पथकाने तो पूर्ण फिट असल्याचे सांगितल्यानंतर तो भारतीय संघात दाखल झाला. त्यामुळे आता राहुल आता चार महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळताना दिसू शकतो.
केएल राहुल 1 मे रोजी आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झालेल्या सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर काही दिवसातच त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
त्यामुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले. पण आता तो दुखापतीतून पूर्ण सावरला असून पुनरागमन करण्यास सज्ज आहे.
केएल राहुलचा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठीही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
संजू सॅमसनबद्दल सांगायचे झाल्यास त्याचा आगामी एशियन गेम्स आणि वर्ल्डकप दोन्ही स्पर्धांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.
आशिया चषकात भारतीय संघाला सुपर फोरमध्ये 10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. त्यानंतर 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे, तर 15 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.