

विशाखापट्टणम: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी तर घेतली आहे, पण उर्वरित दोन सामन्यांत फिरकी गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा भारतीय संघाकडून केली जात आहे. मालिकेतील चौथा सामना उद्या होत आहे.
अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या बेधडक फलंदाजीमुळे मालिकेतील पहिले तिन्ही सामने भारताने सहजपणे जिंकले, परंतु प्रमुख फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. टी-२० विश्वकरंडक स्पर्धा काही दिवसांवर आलेली असताना कुलदीप आणि वरुण यांचा आत्मविश्वास वाढणे आवश्यक आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कुलदीप दोन सामने खेळला आणि त्याला दोनच विकेट मिळवता आल्या. तसेच षटकामागे त्याने ९.५ च्या सरासरीने धावा दिल्याही आहेत. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला नऊ बाद १५३ धावांत रोखण्यात आले तेव्हा कुलदीपच्या तीन षटकांत त्याच्याविरुद्ध ३२ धावा फटकावण्यात आल्या होत्या. ही बाब चिंता करणारी आहे.
या टी-२० मालिकेअगोदर झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही त्याच्या हाती फार यश लागले नव्हते. षटकामागे ७.२८ च्या सरासरीने त्याने धावा दिल्या होत्या. वरुण चक्रवर्तीला तिसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. तो खेळलेल्या पहिल्या दोन सामन्यांत न्यूझीलंडने १९० आणि २०८ धावा फटकावल्या होत्या.
कुलदीपच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जात असताना लेगस्पिनर रवी बिश्नोईने प्रभावी मारा केला होता. ४-०-१८-२ असे त्याच्या गोलंदाजीचे पृथक्करण होते. उद्याच्या सामन्यात कुलदीपऐवजी वरुण असा बदल होऊ शकतो, परंतु विश्वकरंडक स्पर्धेचा विचार करता बिश्नोईचा या स्पर्धेसाठी समावेश करण्यात आलेला नाही.
अभिषेक शर्मा सलामीला अत्यंत आक्रमक फलंदाजी करत असताना दुसरा सलामीवीर संजू सॅमसन मात्र अपयशी ठरत आहे. तिसऱ्या सामन्यात तर त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. त्याला सलामीला खेळवता यावे यासाठी शुभमन गिलला टी-२० संघातून वगळण्यात आले.
उद्याच्या सामन्यात सॅमसनला आणखी एक संधी दिली जाते का? किंवा त्याला वगळून श्रेयस अय्यरला खेळवण्यात येते का? याची उत्सुकता असेल. तिलक वर्मा विश्वकरंडक स्पर्धेसाठी तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभिषेक आणि ईशान ही जोडी सलामीला खेळेल आणि तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.