

Yuvraj Singh reacts to Rohit Sharma Inning : आयपीएल २०२६ च्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि 'हिटमॅन' रोहित शर्माने आपल्या बॅटने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR) अटीतटीच्या सामन्यात रोहितने केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांचा 'ओपनिंग मॅच' शापही मोडीत काढला. रोहितच्या या खेळीनंतर भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने केलेले विधान सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या २२१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईवर मोठा दबाव होता. मात्र, सलामीला आलेल्या रोहित शर्माने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अवघ्या २३ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहित इथेच थांबला नाही, तर त्याने ३८ चेंडूंत ७८ धावांची तुफानी खेळी साकारली. या खेळीत त्याने एकूण ६ चौकार आणि ६ षटकार ठोकले, तर त्याचा स्ट्राइक रेट तब्बल २०५.२६ इतका जबरदस्त होता.
रोहितच्या या अविस्मरणीय खेळीवर खूश होऊन युवराज सिंगने सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. युवी म्हणाला, "मैदानावरील वातावरण बदलले, इतिहास बदलला पण रोहित कधीच बदलला नाही. तोच उत्साह आणि तीच शैली! वर्षभरानंतर टी-२० खेळायला आलेल्या या वाघाने ३८ चेंडूत ७८ धावा कुटून हे सिद्ध केले आहे की, 'शेर कभी शिकार करना नहीं भूलता'. रोहित तुझे मनःपूर्वक अभिनंदन!"
गेल्या काही काळापासून रोहितच्या फॉर्मवर आणि वयावर बोट ठेवून त्याला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्यांना या खेळीने चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. ७८ धावांच्या खेळीसोबतच रोहितने मैदानात क्षेत्ररक्षण करताना जी चपळता दाखवली, त्यावरून तो पूर्णपणे फिट असल्याचे सिद्ध झाले आहे. मुंबई इंडियन्सला १३ वर्षांनंतर हंगामातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून देण्यात रोहितचा वाटा सिंहाचा राहिला आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत २६८ आयपीएल सामन्यांमध्ये ७१२४ धावांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये २ शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत ३०८ षटकार खेचले असून २०२६ च्या या हंगामात तो हे आकडे अधिक उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईला ५ वेळा जेतेपद मिळवून देणारा हा खेळाडू आता केवळ एक खेळाडू म्हणून खेळत असला, तरी त्याचे मैदानावरील अस्तित्व आजही प्रतिस्पर्धी संघासाठी धडकी भरवणारे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.