भारतीय क्रिकेट संघाने रांचीमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
रांचीत झालेल्या चौथ्या कसोटीत भारताच्या विजयात ध्रुव जुरेल, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, आकाश दीप अशा खेळाडूंचे मोठे योगदान राहिले.
सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने त्यांचे कौतुक करण्याबरोबरच म्हटले आहे की ज्यांना खेळण्याची भूक आहे, त्यांना संधी दिली जाईल.
दरम्यान बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच जे खेळाडू भारतीय संघात नाहीत, त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले होते. तसेच असे न झाल्यास कारवाई होऊ शकते, याबद्दलही सुचित केल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते.
इशान किशन, श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंनी रणजी ट्रॉफीत खेळण्याचे टाळल्यानंतर बीसीसीआयने असे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. इशान मानसिक थकव्याचे कारण सांगून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून परत आल्यानंतर कोणताही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही.
तसेच श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यात खेळला. पण नंतर त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली नाही. त्यानंतरही तो पाठीच्या दुखापतीचे कारण सांगून रणजी ट्रॉफीमध्ये खेळला नाही. त्यामुळे सध्या या गोष्टींची चर्चा बीसीसीआयमध्ये होत असल्याचे म्हटले जात आहे.
विशेष म्हणजे आयपीएलपूर्वी होणाऱ्या डीवाय पाटील टी20 स्पर्धेत हे खेळाडू खेळणार असल्याचे म्हटले जात आहे. ही स्पर्धा बीसीसीआयच्या अंतर्गत येत नाही. ही एक कॉर्पोरेट स्पर्धा असून खेळाडू आयपीएलच्या तयारीसाठी यात खेळतात.
दरम्यान, या चर्चा सुरू असतानाच रोहितने रांची कसोटीनंतर केलेल्या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
रोहित म्हणाला, 'कसोटी क्रिकेट हा सर्वात अवघड प्रकार आहे. जर तुम्हाला या प्रकारात यश हवे असेल आणि टिकायचे असेल, तर तुम्हाला भूक असणे गरजेचे आहे. हे खूप महत्त्वाचे आहे.
'आम्ही त्याच खेळाडूंना संधी देऊ, ज्यांच्यात ही भूक आहे. ज्या खेळाडूंना या प्रकारात खेळण्याची भूक नाही, ते खेळाडू लगेचच समजतात. ज्या खेळाडूंना खेळायचे नाही, ते आपल्याला कळतात.'
दरम्यान, रोहितने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही. तो म्हणाला, 'ज्या खेळाडूंना भूक आहे, ज्यांना इथे खेळायचे आहे आणि कामगिरी करून दाखवायची आहे, कठीण परिस्थितीत खेळायचे आहे, आम्ही अशा खेळाडूंनाच पसंती देऊ. हे समजणे खूपच साधं आहे. जर भूक नसेल, तर अशा खेळाडूंना खेळवण्यात काहीच अर्थ नाही.'
भारतीय संघाकडून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यात सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप, रजत पाटीदार, देवदत्त पडीक्कल अशा काही खेळाडूंचा समावेश आहे.
रोहित पुढे म्हणाला, 'सध्या संघात असलेल्या किंवा नसलेल्या खेळाडूंमध्ये असे कोणीही दिसत नाही, ज्यांच्यात भूक नाही. सर्वांना खेळायचे आहे, पण या स्तरावर खूप कमीवेळा संधी मिळते.'
'जर तुम्ही त्याचा फायदा घेतला नाही, तर तुम्ही संधी गमावता. आम्ही सर्वांनी त्याचा अनुभव घेतला आहे. जे खेळाडू मिळालेल्या संधीचा फायदा घेतात आणि संघाच्या विजयात योगदान देतात, जे संघासाठी कामगिरी करतात, ते नेहमीच लक्षात येतात.'
रोहितला आयपीएलबद्दलही प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला, त्यावर रोहित म्हणाला, 'आयपीएल आमच्यासाठी आहे, यात शंका नाही. एक चांगला प्रकार आहे. पण कसोटी क्रिकेट सर्वात कठीण प्रकार आहे आणि यात यश मिळवणे सोपे नाही.'
'आम्ही आत्तापर्यंत खेळलेले चार कसोटी सामने पाहिले, तर जे तीन विजय आम्हाला मिळाले, ते सोपे नव्हते. आम्हाला त्यासाठी मेहनत करावी लागली. खेळाडूंना खेळपट्टीवर खेळावे लागले, गोलंदाजांना मोठे स्पेल टाकावे लागले. त्यामुळे या प्रकारात मेहनत गरजेची असते.'
इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थिती भारताकडून युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी करत लक्ष वेधले आहे. त्यांचेही रोहितने कौतुक केले.
तो म्हणाला, 'त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिले की त्यांना इथे खेळायचे आहे. त्यांनी मोठे होत असताना याआधी केलेली सर्व मेहतन महत्त्वाची ठरली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडू, स्थानिक क्लबसाठी खळून, तिथे चांगली कामगिरी करून ते इथे आले आहेत. नक्कीच कसोटी क्रिकेट खेळणे, मोठे आव्हान आहे. मी जेव्हाही या खेळाडूंशी बोलतो, तेव्हा त्यांचे उत्तर प्रेरणादायी असते.'
'त्यामुळे माझे आणि द्रविड भाईचे काम हेच आहे की आम्ही त्यांना हवे तसे वातावरण निर्माण करू आणि मैदानात जाऊन त्यांचे खेळताना त्यांच्यावर दबाव येणार नाही, हे पाहू. त्यांना सातत्याने त्यांच्या खेळाबद्दल सांगण्यात काही अर्थ नाही. कारण ते इथे आलेत म्हणजे त्यांना काय करायचे आहे, हे त्यांना स्पष्ट आहे.'
याशिवाय रोहित असेही म्हणाला की हे खेळाडू बरेच युवा आहेत, ते येत्या 5-10 वर्षात नियमितपणे या कसोटीत खेळताना दिसू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.