

मुंबई: मुंबईचे वानखेडे स्टेडियम आणि रोहित शर्माचं एक अतूट नातं आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यासाठी जेव्हा रोहित वानखेडेवर पोहोचला, तेव्हा एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विश्वचषक २०२६ चा 'ब्रँड ॲम्बेसेडर' म्हणून रोहितने मैदानात पाऊल ठेवलं, मात्र खेळाडूंच्या ड्रेसिंग रूमकडे पाहताना त्याला आपल्या भावना अनावर झाल्या.
आयसीसीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये रोहित शर्मा अत्यंत भावनिक झालेला दिसत आहे. टी-२० विश्वचषक २०२४ चा विजेता कर्णधार असलेल्या रोहितने आता आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती घेतली आहे.
मैदानावर जय शाह यांच्यासोबत ट्रॉफी घेऊन येताना रोहितने ड्रेसिंग रूममध्ये उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज यांच्याकडे पाहिले. यावेळी रोहित म्हणाला, "इथे उभं राहणं खूप विचित्र वाटतंय... तिथून (ड्रेसिंग रूममधून) इथे येणं... खूप वेगळं वाटतंय." मैदानावर खेळाडू म्हणून असण्याऐवजी पाहुणा म्हणून उपस्थित राहतानाची खंत रोहितच्या शब्दांतून स्पष्ट जाणवत होती.
नाणेफेकीच्या (Toss) वेळी एक मजेशीर आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा क्षण पाहायला मिळाला. कर्णधार सूर्यकुमार यादव पळत रोहितकडे गेला आणि विचारले, "काय करू? फलंदाजी घेऊ का?" यावर रोहित आपल्या खास शैलीत म्हणाला, "फिल्डिंग कर, वेडा आहेस का?" रोहितचा हा 'रोखठोक' सल्ला ऐकून सोशल मीडियावर चाहत्यांनी जुन्या 'कॅप्टन रोहित'च्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अमेरिकेवर विजय मिळवत विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली आहे. मात्र, या सामन्यात भारतीय फलंदाजी काहीशी डगमगलेली पाहायला मिळाली. अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे शून्यावर बाद झाले, तर इशान किशन आणि हार्दिक पांड्याही अपयशी ठरले.
शेवटी कर्णधार सूर्याने ८४ धावांची झुंजार खेळी करत भारताला १६१ धावांपर्यंत नेले. उत्तरादाखल अमेरिकेचा संघ ८ गड्यांच्या बदल्यात १३२ धावाच करू शकला. ३० धावांनी विजय मिळवूनही, रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा संघर्ष प्रकर्षाने जाणवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.