Why Team India lost in WTC Final 2023: कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचे दुसरे पर्व (2021-23) रविवारी (11 जून) संपले. या पर्वात ऑस्ट्रेलिया आणि भारत संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यांच्या 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर अंतिम सामनाही झाला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारत कसोटीतील विश्वविजेतेपद आपल्या नावे केले.
ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच कसोटी विश्वविजेतेपदावर नाव कोरले. मात्र भारतीय संघाचा सलग दुसऱ्यांदा अपेक्षाभंग झाला. भारतीय संघाने या स्पर्धेच्या पहिल्या पर्वातही (2019-21) न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात पराभवाचा सामना केला होता. यावेळी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभव स्विकारला.
भारतीय संघाने दोन वर्षे चांगली कामगिरी करत आणि मायदेशात पूर्ण वर्चस्व राखत अंतिम सामना गाठला होता. पण अंतिम सामन्यातील जवळपास पाचही दिवस ऑस्ट्रेलिया वरचढ राहिलेले दिसले. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाकडून काय चूका झाल्या असाव्यात यावर नजर टाकू.
भारतीय संघातील चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळला, तर जवळपास सर्व खेळाडू 2 महिन्यांची आयपीएल स्पर्धा खेळून आले होते. आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना आणि कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना यात साधारण आठवड्याभराचे अंतर होते.
याच कालावधीत भारतीय खेळाडू इंग्लंडला दाखल झाले. त्यामुळे खेळाडूंकडे टी20 क्रिकेटमधून कसोटीसाठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. तसेच या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला सराव सामनाही खेळता आला नाही. जर कदाचीत अधिकवेळ असता, तर भारतीय खेळाडू पूर्ण ताजे तवाने असते, त्याचबरोबर सराव सामन्याने परिस्थितीचा चांगला अंदाजही घेता आला असता.
भारतीय गोलंदाजांना कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी मिळाल्याने सुवर्णसंधी मिळाली होती.
कारण, या सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रावेळी ढगाळ वातावरण होते, या परिस्थितीत गोलंदाजांना मदत मिळत होती. पण भारतीय संघाने पहिल्या सत्रात सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला मोठे धक्के देण्याची संधी गमावली.
मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅब्युशेन यांनी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येसाठी पाया रचून दिला होता. तरी त्यांना अधिक धोकादायक भारतीय गोलंदाजांनी ठरू दिले नव्हते. त्यामुळे 76 धावांवर ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्स गमावल्या होत्या.
मात्र, त्यानंतर उन पडलं आणि खेळपट्टी फलंदाजीला पोषक होत गेली. त्यातच भारतीय गोलंदाजांची टप्पा आणि दिशा ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ विरुद्ध गोलंदाजी करताना बिघडल्याचे दिसले.
हेडने केलेल्या आक्रमणामुळे भारतीय गोलंदाजीची लय बिघडली अन् त्यानंतर पहिल्या दिवशी नंतर भारतीय गोलंदाजांना विकेट्स घेताच आल्या नाही. हेड आणि स्मिथच्या द्विशतकी भागीदारीने पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला 300 च्या पार नेले.
दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चूका सुधारलेल्या दिसल्या आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाला 500 धावा करण्यापासून रोखले. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या वरच्या फळीला फार काळ टिकू दिले नव्हते. तरी स्मिथ आणि लॅब्युशेन यांनी अर्धशतकी भागीदारी केली होती.
पण त्यांनाही फार मोठी खेळी करू दिली नव्हती. मात्र नंतर ऍलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क यांच्यातील 8 व्या विकेटसाठीची भागीदारी लवकर तोडण्यात अपयश आले. त्यांनी तब्बल 93 धावांची भागीदारी केली. त्याचा जोरदार फटका भारताला पोहचला आणि ऑस्ट्रेलियाने तब्बल 444 धावांचे आव्हान उभे केले.
आर अश्विन कसोटीतील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. पण इंग्लंडमधील वेगवान गोलंदाजीला पोषक वातावरण पाहून भारताने एकच फिरकीपटू आणि चार वेगवान गोलंदाज खेळवले. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या संघात 5 डावखुरे फलंदाज असताना अश्विन सारख्या फिरकीपटूला बाहेर ठेवणे भारताला महागात पडले. याबद्दल सचिन तेंडुलकरनेही भारतीय संघावर टीका केल.
विशेष म्हणजे अश्विनप्रमाणेच गोलंदाजी करणाऱ्या नॅथन लायनने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. याशिवाय भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजानेही दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे कदाचीत आर अश्विन असता, तर त्याचा अनुभव आणि गोलंदाजी महत्त्वाची ठरू शकली असती. त्याचबरोबर तो खालच्या फळीत फलंदाजीमध्येही काहीप्रमाणात योगदान देऊ शकतो.
या सामन्यानंतर कर्णधार म्हणून रोहितला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्याने या सामन्यात गोलंदाजांमध्ये बदल करताना अनेक चूका केल्याचे दिसले. त्याने पहिल्या डावात चारही वेगवान गोलंदाजांना छोटे छोटे स्पेल देत जर बदल केले असते, तरी गोलंदाजांनाही पुरेशी विश्रांती मिळाली असती आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांना स्थिरावण्याची संधी मिळाली नसती.
पण पहिल्याच डावात भारतीय वेगवान गोलंदाजांनी मोठे स्पेल केले. त्यातच भारतीय गोलंदाज जवळपास अडिच महिन्यांनी कसोटीत गोलंदाजी करत होते. हा विचार करूनही छोट्या-छोट्या स्पेलचा उपयोग झाला असता. ही चूक ऑस्ट्रेलियाने मात्र सुधारली. त्यांच्या गोलंदाजांना पॅट कमिन्सने छोटे-छोटे स्पेल दिले होते. ज्यामुळे भारतीय फलंदाजी स्थिरावली नाही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रोहित कसोटीमध्ये भारताचे पहिल्यांदाच नेतृत्व करत होता.
या संपूर्ण सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजांना समान संधी असल्याचे दिसले होते. दरम्यान, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मोठ्या भागीदारी रचण्याकडे लक्ष दिल्याचे दिसले. पहिल्या डावात ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथच्या शतकानेच भारताला मागे ढकलले होते. त्यात ऍलेक्स कॅरीने दोन्ही डावात (48, 66*) उपयुक्त खेळी केल्या.
त्याचबरोबर मार्नस लॅब्युशेननेही दोन्ही डावात मोठी खेळी केली नसली, तरी सुरुवातीच्या कठीण काळात त्याने दोन्ही डावात अर्धशतकी भागीदारी करत पाया रचून दिला होता. याशिवाय दुसऱ्या डावात मिचेल स्टार्कच्या 41 धावाही भारतीय संघाला त्रास देऊन गेल्या.
अंतिम सामन्यात भारतीय संघाला वरच्या फळीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, दोन्ही डावात भारताची वरची फळी अपयशी ठरली. तरी अजिंक्य रहाणेची दोन्ही डावातील फलंदाजी सुखावणारी होती. तसेच शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने पहिल्या डावात केलेली फलंदाजी महत्त्वाची ठरली.
मात्र, एकूण भारतीय फलंदाजांच्या अपयशाचे कारण ऑस्ट्रेलियाच्या चांगल्या गोलंदाजीबरोबरच चूकीच्या शॉट्सची निवड हे देखील आहे. भारतीय फलंदाजांना आयपीएलमध्ये टी२० शॉट्स खेळण्याची लागलेली सवय नडल्याचे दिसले.
विराट दुसऱ्या डावात चांगला खेळत असताना बाहेरचा चेंडू मारण्याची चूक करून बसला, रोहितही चांगल्या लयीत असताना स्विपचा फटका मारण्यासाठी गेला. पुजारा, शुभमन गिलकडूनही अशाच टाळता येणाऱ्या चूका झाल्या. इंग्लंडमध्ये नेहमीच फलंदाजी करताना पूर्ण लक्ष केंद्रित करावी लागते, पण भारतीय फलंदाज यात चूक करून बसले आणि बाद झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.