Rohit Sharma Statement after WTC Final Defeat: रविवारी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. द ओव्हल मैदानावर या स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवत कसोटी विश्वविजेतेपदावर नाव कोरले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला दुसऱ्या डावात 63.3 षटकात सर्वबाद 234 धावा करता आल्या. यामुळे भारताचे पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यात अपयश आले आहे.
या पराभवानंतर रोहित शर्माने प्रतिक्रिया देताना कुठे चूक झाली याबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला, 'मला वाटते आम्ही नाणेफेक जिंकून त्यांना त्या परिस्थितीत प्रथम फलंदाजी करायला लावून चांगली सुरुवात केली होती. आम्ही पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली. पण नंतर आम्ही ज्याप्रकारे गोलंदाजी केली, त्यातून आम्ही स्वत:लाच निराश केले.'
'आम्हाला ऑस्ट्रेलियन फलंदाजांना श्रेय द्यावे लागेल. ट्रेविस हेडने मैदानात येत स्टीव्ह स्मिथबरोबर खूपच चांगला खेळला. त्यामुळे आम्ही काहीसे मागे पडलो. आम्हाला माहित होते की पुनरागमन कठीण आहे, पण आम्ही चांगला खेळ केला आणि शेवटपर्यंत झुंज दिली.'
दरम्यान, सलग दुसऱ्यांदा भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे. यापूर्वी कसोटी चॅम्पियनशीप 2019-21 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. याबद्दलही रोहितने म्हटले की सलग दोन अंतिम सामने खेळणे ही देखील मोठी गोष्ट आहे.
तो म्हणाला, 'आम्ही गेली चार वर्षे मेहनत घेतली आहे. दोन अंतिम सामने खेळणे हे मोठे यश आहे. पण आम्हाला आणखी एक पाऊल पुढे जायला आवडले असते. इथपर्यंत येण्यासाठी आम्ही घेतलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संपूर्ण संघाने चांगले प्रयत्न केले. दुर्दैवाने आम्ही पुढे जाऊ शकलो नाही आणि अंतिम सामना जिंकू शकलो नाही. पण आम्ही आमची मान ताठ ठेऊ आणि लढत राहू.'
रोहित क्रिकेट चाहत्यांबद्दल म्हणाला, 'प्रेक्षकांचा पाठिंबा अविश्वसनीय होता. मी त्या सर्वांचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला प्रत्येक धावेसाठी आणि विकेटसाठी पाठिंबा दिला.'
या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकून ऑस्ट्र्लियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. तसेच स्टीव स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. तसेच भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 296 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली, तसेच शार्दुल ठाकूरने 51 धावा केल्या. याशिवाय रविंद्र जडेजाने 48 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून ऍलेक्स कॅरीने सर्वाधिक नाबाद 66 धावांची खेळी केली. तसेच मार्नस लॅब्युशेन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 41 धावा केल्या.
भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हा डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीमुळे भारतासमोर 444 धावांचे आव्हान ठेवले.
त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तसेच अजिंक्य रहाणेने 46 आणि रोहित शर्माने 43 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणाला फार काही खास करता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.